शेला, धोतर, फेटा अन् दागिन्यांचा साज घेतो मनाचा ठाव; ‘या’ वैशिष्ट्यांमुळे हवी पेणचीच मूर्ती
By राजेश भोस्तेकर | Published: July 28, 2024 11:51 AM2024-07-28T11:51:21+5:302024-07-28T11:51:58+5:30
पेणचे गणराय हे रेखीव आखणी, आकर्षक रंगरंगोटी, शेला, धोतर, फेटा आणि दागिन्यांच्या सजावटीसाठी प्रसिद्ध आहेत.
राजेश भोस्तेकर, अलिबाग : तू सुखकर्ता तू विघ्नहर्ता, विघ्न विनाशक मोरया या उक्ती प्रमाणे गणराय हा विघ्न नाशक तसेच बुध्दीची देवता म्हणून पूजला जातो. पेण तालुका हा गणरायाच्या मूर्ती बनविण्याच्या व्यवसायात अग्रेसर आहे. नवरात्र झाली की गणेश कला केंद्रात गणरायाच्या मूर्ती तयार करण्यास सुरुवात होते. यंदाही ती सुरू असून गणेश कला केंद्रात बाप्पांची मूर्ती आकाराला आली असून आता सजावटीची लगबग सुरू आहे. रंगरंगोटी केल्यानंतर श्री गणेशाचे रूप दिसू लागते. पेणचे गणराय हे रेखीव आखणी, आकर्षक रंगरंगोटी, शेला, धोतर, फेटा आणि दागिन्यांच्या सजावटीसाठी प्रसिद्ध आहेत.
‘या’ वैशिष्ट्यांमुळे हवी पेणचीच मूर्ती
वेगवेगळ्या आकारातील साचे, मातीकाम, आखणी, आकार, अलंकार, डोळे करणी, हातातील आयुधे, आसन-सिंहासन, महिरप, आभूषणे, वस्त्रालंकार, अस्त्रालंकार, बालमूर्ती, सार्वजनिक मूर्ती हे पेणमधील मूर्तींचे वैशिष्ट्य आहे.
पेण शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये गणेशमूर्तींचे दीड हजारांहून अधिक कारखाने आहेत. तब्बल दीड लाखांहून अधिक व्यक्ती मूर्ती व्यवसायांत विविध प्रकारे जोडल्या गेल्या आहेत.
वर्षभरातील ११ महिने मूर्तिकाम आणि शेवटच्या महिन्यात विक्री, असे व्यवसायाचे स्वरूप आहे. बहुतांश जण जोपासताहेत पिढ्यानपिढ्यांचा मूर्तिकलेचा वारसा.
मूर्तिकाम हा जीवनाचा अविभाज्य भाग. जिकडे पाहावे तिकडे आकर्षक मूर्ती आणि मातीला आकार देत मूर्ती घडविणारे दिवस-रात्र झटणारे हजारो हात.
कारागीर तासन् तास एकाच ठिकाणी बसून कोणाशीही न बोलता एकाग्रतेने काम करीत असतात. ते जीव ओतून हात चालवतात तेव्हा मातीला विशिष्ट आकार येऊन ती जिवंत होते.
अर्थातच, त्यासाठीचा त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव, कलेशी असलेला प्रामाणिकपणा आणि मेहनतीचे मोल कोणालाही करता आलेले नाही.
मूर्तिकला क्षेत्रात नेहमी चढ-उतार येत असतात. कधी अतिवृष्टी, कधी पीओपीवरील बंदी... अशा एक ना अनेक संकटांचा सामना पेणच्या मूर्ती कारागिरांना करावा लागतो.
गावातच राहून वर्षाचे बाराही महिने रोजगार मिळतो.
साधारणत: १० ते २० कारागिरांच्या हातातून साकारल्या जात आकर्षक गणेश मूर्ती. प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडूच्या मूर्तींना मागणी.
गणेशोत्सवाच्या दीड-दोन महिने आधीपासूनच देशांतर्गत मूर्तीचे बुकिंग. जानेवारीपासून परदेशात पाठविल्या जाणाऱ्या मूर्तींचे बुकिंग. मार्च-एप्रिलपासून जलमार्गाने सुरू होतो प्रवास.