अवेळी पावसामुळे हजाराे हेक्टर्सवरील भात पिकाला फटका
By निखिल म्हात्रे | Published: November 8, 2023 07:48 PM2023-11-08T19:48:23+5:302023-11-08T19:49:17+5:30
अवकाळी पावसामुळे भातशेताकडे पाहून शेतकरी गहिवरून जात आहे. त्यामुळे भात कापणी करावी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.
अलिबाग : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवीत बुधवारी दुपारी रायगड जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे बळीराजाची तारांबळ उडाली. चांगला उतरा मिळणार या आशेवर असतानाच पावसाने तडाखा दिला. आज शेतात भात पीक भिजून नुकसान झाले आहे. वातवरण असेच राहिले तर मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
अवकाळी पावसामुळे भातशेताकडे पाहून शेतकरी गहिवरून जात आहे. त्यामुळे भात कापणी करावी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. हाती आलेले पीक पावसाने हिरावून घेतल्याने वर्षभर मेहनत करून भरघोस आलेले भाताचे पीक पावसामुळे वाया जात असल्याने शेती पिकवावी की नाही, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहे. दुसरीकडे मजूर मिळत नसल्याने अडचण वाढत आहे. प्रसंगी ४०० रुपये, ५०० रुपये व ६०० रुपये देऊनही मजूर मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
गेले काही वर्षे अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. पाऊस आणखी पडला तर यावर्षीही मोठ्या नुकसानीला आम्हाला सामोरे जावे लागणार आहे. पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची भात कापणी एकाच वेळी आल्याने मजूरदार मिळेनासा झाला असल्याने मजुरदारांचा भाव चांगलाच वधारला आहे.