मूकबधिर मुले अंधारात
By admin | Published: October 1, 2015 11:49 PM2015-10-01T23:49:35+5:302015-10-01T23:49:35+5:30
सरकारच्या अपंग कल्याण विभागाच्या बेफिकिरीचा फटका येथील सरकारी मूकबधिर विद्यालयाला बसला आहे. वेळेत निधी न आल्याने विद्यालयाचे सुमारे पाच महिन्यांचे लाइट बिल थकल्याने एमएसईबीने लाइट कापली
अलिबाग : सरकारच्या अपंग कल्याण विभागाच्या बेफिकिरीचा फटका येथील सरकारी मूकबधिर विद्यालयाला बसला आहे. वेळेत निधी न आल्याने विद्यालयाचे सुमारे पाच महिन्यांचे लाइट बिल थकल्याने एमएसईबीने लाइट कापली. त्यामुळे विद्यालयातील १८ विद्यार्थी अंधारातच होते. मात्र कार्यालय अधीक्षक असणाऱ्या महिलेने त्या विद्यार्थ्यांना रात्रभर स्वत:च्या घरात आसरा देत माणुसकीचे दर्शन घडविले. रायगड जिल्हा परिषदेने आपल्या पदरचे पैसे पुढे करीत मूकबधिर विद्यालयाचे ३८ हजार ६५० रुपयांच्या लाइट बिलाची रक्कम गुरुवारी चुकती केली. त्यानंतर तब्बल २७ तासांनंतर वीजपुरवठा पूर्ववत सुरु झाला.
मूकबधिर विद्यालयामध्ये २१ विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील १८ विद्यार्थी तेथील वसतिगृहामध्येच राहतात, तर उर्वरित तीन विद्यार्थी पालकांसोबत त्यांच्या घरी राहतात. या विद्यालयाचा सर्व खर्च भागविण्यासाठी सरकारच्या पुणे येथील अपंग कल्याण विभागाकडून एक रकमी सुमारे तीन लाख रुपयांचा निधी येतो. मात्र सातत्याने पत्रव्यवहार करुनही तो आलेला नाही. विद्यालयातील लाइट बिल हे एप्रिलपासून थकले होते. एमएसईबीकडूनही सातत्याने बिल भरण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. मात्र पैसेच नसल्याने ते भरणार कुठून असा प्रश्न येथील प्रभारी अधीक्षक सुवर्णा धुमाळ यांना पडला होता.
बुधवारी दुपारी एमएसईबीचे कर्मचारी आले आणि त्यांनी विद्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे मूकबधिर विद्यालय अंधारात बुडाले. तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बोलता ऐकता येत नाही. त्यातच अंधाराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे सुवर्णा धुमाळ यांच्यातील आईचे काळीज हेलावले. त्यांनी तेथील १८ विद्यार्थ्यांना आपल्या घरी नेले. धुमाळ या त्याच इमारतीच्या परिसरात राहतात. रात्र काढल्यानंतर तातडीने वीजपुरवठा सुरु व्हावा यासाठी धुमाळ यांनी सकाळी लवकर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण कार्यालय गाठले. तेथील अधिकाऱ्यांना सर्व परिस्थिती सांगितली. त्यानंतर जिल्हा परिषदेने आपल्या पदरचे ३८ हजार ६५० रुपयांच्या लाइट बिलाचा चेक काढल्याचे अधीक्षक सुवर्णा धुमाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)