खड्ड्यांमुळे नागोठणे, शिहू रस्त्याची दैनावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:14 AM2018-08-20T04:14:16+5:302018-08-20T04:14:45+5:30
नागोठणे-पोयनाड मार्गावर नागोठणे ते शिहू हा साधारणत: १० कि.मी.चा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे.
नागोठणे : नागोठणे-पोयनाड मार्गावर नागोठणे ते शिहू हा साधारणत: १० कि.मी.चा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या मार्गाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे, त्यामुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत.
या रस्त्यावरून प्रवास करताना आरोग्याच्या व्याधी उद्भवत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. वाहनांचे नुकसान होत असल्याने चालकांकडूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याच मार्गात रिलायन्सचा मोठा प्रकल्प व तेथील कर्मचाऱ्यांचे निवासी संकुल आहे. येथील कर्मचारी-अधिकारीही खड्डेमय रस्त्यामुळे त्रस्त आहेत. नागोठणे शिहू रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असला, तरी रिलायन्सने सामाजिक बांधीलकी जपत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
१३ सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरू होत असल्याने त्याआधी रस्त्याची दुरुस्ती व्हावी आणि गणेशभक्ताचा प्रवास निर्विघ्न व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.
दुचाकी घसरून अपघात
नागोठणे शिहू रस्त्याची दुरवस्था झाल्याने एसटी प्रवाशांना कंबरदुखी, पाठदुखी, सांधेदुखी सारखे आजार उद्भवत आहेत. शिवाय खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खोलीचा अंदाज येत नसल्याने दुचाकी घसरून अपघात होत आहेत.