डंपरची वीज खांबाला धडक; गाव अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 03:54 AM2018-08-26T03:54:50+5:302018-08-26T03:55:16+5:30
तालुक्यातील उमरोली येथे खरवली बाजूने येणाऱ्या चालकाचा कार (एमएच ४६ एएफ २९३१)वरील ताबा सुटल्याने ती डीपीजवळच्या वीज खांबाला धडकली, त्यामुळे वीज खांबालगतच्या केबल
माणगाव : तालुक्यातील उमरोली येथे खरवली बाजूने येणाऱ्या चालकाचा कार (एमएच ४६ एएफ २९३१)वरील ताबा सुटल्याने ती डीपीजवळच्या वीज खांबाला धडकली, त्यामुळे वीज खांबालगतच्या केबल कारच्या मागील भागात अडकल्याने पूर्णपणे तुटल्या. तिन्ही खांबाचे मोठे नुकसान झाले. जेव्हा हा अपघात झाला, तेव्हा वीजपुरवठा सुरू होता. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमरोली येथे १० च्या सुमारास कारचालक मद्यपान करून गाडी चालवत होता. त्याला उभेही राहता येत नसल्याचे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी बोलून दाखवले. अपघातात तीन वीज खांबांचे मोठे नुकसान झाले असून, दोन दिवस उलटून गेले तरी गावातील वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. या प्रकरणी जोपर्यंत चालकावर कारवाई होत नाही आणि नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत वीज मंडळाकडून काम करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
उमरोली गावामध्ये साधारण ३०० ते ४०० लोकसंख्या आहे. तेथील ग्रामस्थ दोन दिवसांपासून रात्र अंधारात काढत आहेत. कारमालक व चालक ग्रामस्थांच्या भेटीला वा झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास आला नाही तर गाडीचालकाच्या मालकावर व त्या चालकावर रीतसर कारवाई करणार असल्याचे ग्रामस्थांनी या वेळी सांगितले.