मोकळ्या भूखंडावर डम्पिंग ग्राउंड
By Admin | Published: July 13, 2016 02:02 AM2016-07-13T02:02:02+5:302016-07-13T02:02:02+5:30
तळोजा येथील क्षेपणभूमीवर स्थानिकांनी कचरा टाकण्यास मनाई केल्याने सिडको वसाहतीतील कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे.
कळंबोली : तळोजा येथील क्षेपणभूमीवर स्थानिकांनी कचरा टाकण्यास मनाई केल्याने सिडको वसाहतीतील कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. तीन-चार दिवसांतून एकदा कचरा उचलला जात आहे. कचरा उचलला तरी टाकायचा कुठे, हा प्रश्न आहे. त्यामुळे कळंबोली परिसरातील मोकळ्या भूखंडावर कचरा डम्प करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
कळंबोली येथील मलनिस्सारण केंद्रालगत असलेल्या मोकळ्या भूखंडावर सध्या कचरा टाकण्यात येत असला तरी शहरातील रस्त्यावर कचऱ्याचे ढीग जैसे थे आहेत. तळोजा घोट येथे सिडकोचे क्षेपणभूमी असून, या ठिकाणी वसाहतींबरोबरच पनवेल नगरपालिकेतर्फे कचरा टाकला जातो. येथे शास्त्रशुद्ध पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असल्याचा सिडकोचा दावा आहे. परंतु दुर्गंधी आणि प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करीत स्थानिकांनी क्षेपणभूमीला विरोध केला आहे. पावसाळ्यात कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी येत असल्याने गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ्यात या ठिकाणी कचरा टाकण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे.
सिडकोकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने गेल्या काही दिवसांपासून नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा, करंजाडे, उलवे, द्रोणागिरीसह सिडको हद्दीत मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. सिडकोने नवी मुंबई महापालिकेकडे तुर्भे येथील डंम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकू देण्याची विनंती केली होती. मात्र महापालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने सिडकोसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.