तोंडसुरे शाळा भरते कोसळलेल्या इमारतीत

By admin | Published: August 13, 2016 04:03 AM2016-08-13T04:03:23+5:302016-08-13T04:03:23+5:30

तालुक्यातील आयएसओ मानांकित व रायगड जिल्हा परिषदेने आदर्श पुरस्कार देऊन गौरव केलेली प्राथमिक तोंडसुरे शाळेची इमारत २८ जून २०१६ रोजी मुसळधार पावसात कोसळली.

The dungeons in the school filled with dungeons | तोंडसुरे शाळा भरते कोसळलेल्या इमारतीत

तोंडसुरे शाळा भरते कोसळलेल्या इमारतीत

Next

म्हसळा : तालुक्यातील आयएसओ मानांकित व रायगड जिल्हा परिषदेने आदर्श पुरस्कार देऊन गौरव केलेली प्राथमिक तोंडसुरे शाळेची इमारत २८ जून २०१६ रोजी मुसळधार पावसात कोसळली. त्यावेळी तीनपैकी दोन वर्गखोल्यांचे नुकसान झाले असून एका वर्गखोलीच्या भिंतीला तडे गेले आहेत. पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने कोसळलेल्या इमारतीमध्येच शाळा भरवली जात आहे. इमारत कोसळून एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असतानाही रायगड जिल्हा परिषदेने नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध केला नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
म्हसळा तालुक्यातील प्राथमिक शाळेची इमारत १९६१ मध्ये बांधण्यात आली. सद्यस्थितीत शाळेमध्ये पहिली ते सातवीचे वर्ग भरत असून ५१ विद्यार्थी शिकत आहेत. शालेय व्यवस्थापन समिती, तीन गाव समिती व शिक्षकवृंद यांनी अथक परिश्रम घेऊन शैक्षणिक दर्जासोबतच शाळेची सुसज्ज इमारत व विविध सोयी-सुविधांनी परिपूर्ण केल्याने शाळेला तीन वर्षांपूर्वी आयएसओ मानांकन व रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार मिळवण्यात यश आले. १९६१ मध्ये शाळेचे बांधकाम चिखल - मातीमध्ये करण्यात आले असल्याने ५५ वर्षे जुन्या इमारतीला भार सोसवत नसल्याने कमकुवत झाली होती. इमारतीची डागडुजी करणे ग्रामस्थांच्या आवाक्याबाहेर असल्याने गेली पाच वर्षे ग्रामस्थ शाळेला नवीन इमारत मिळावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करीत आहेत. सन २०१३ व २०१४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता श्रीवर्धन यांनी इमारत धोकादायक असल्याचे रायगड जिल्हा परिषदेला कळवले. मात्र जिल्हा परिषदेच्या उदासीन भूमिकेमुळे अखेर २८ जून २०१६ रोजी शाळेची इमारत कोसळली.
इमारत कोसळल्याने जिल्हा परिषद आतातरी गांभीर्याने लक्ष देईल अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. मात्र पदरी निराशा पडल्याने व पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने कोसळलेल्या इमारतीमधील भिंतीला तडे गेलेल्या एका वर्गखोलीत सहावी व सातवीचे वर्गातील विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. जीव मुठीत घेऊनच शिक्षक शिकवत आहे. (वार्ताहर)

तड्यांमुळे पिलर व भिंतीतील अंतरात वाढ
तड्यांमुळे पिलर व भिंत यामधील अंतर वाढत असून दयनीय अवस्था आहे. आपला पाल्य धोकादायक इमारतीच्या शाळेत शिकत असल्याने पालक दिवसातून अनेक वेळा फेरी मारून चौकशी करीत आहेत. शाळेत दर्जेदार शिक्षण मिळते, शाळेचे शिक्षकही चांगले आहेत.
मात्र रायगड जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य संकटात सापडले आहे असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. गेली पाच वर्षे ग्रामस्थ शाळेला नवीन इमारत मिळावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र याची दखल घेतली जात नाही.

Web Title: The dungeons in the school filled with dungeons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.