कोल्हापूर : दुर्गराज रायगडावर देशभरातील हजारो शिवभक्तांची उपस्थिती आणि विविध कार्यक्रमांनी शिवराज्याभिषेक सोहळा गुरुवारी (दि. ६) दिमाखात साजरा होणार आहे. या वर्षी ‘जागर शिवकालीन युद्धकलेचा’ व ‘सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे मुख्य आकर्षण असणार आहे; त्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक खासदार संभाजीराजे, शहाजीराजे आणि पाच देशांचे राजदूत प्रमुख उपस्थित असतील, अशी माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
फत्तेसिंह सावंत म्हणाले, शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर बुधवारी सायंकाळी ‘जागर शिवकालीन युद्धकलेचा’ हा मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम होणार आहे. त्यात ३० हून अधिक युद्धकला आखाडे सहभागी होतील.
सोहळा होणार असा
बुधवारी दुपारी ४ वाजता : खासदार संभाजीराजे, शहाजीराजे यांचे स्वागत आणि त्यांच्यासमवेत शिवभक्तांचे चित्त दरवाजा येथून पायी चालण्यास प्रारंभ.सायंकाळी ५ वाजता : नगारखाना येथे गडपूजन. होळीचा माळ येथे जागर शिवकालीन युद्धकलेचा.सायंकाळी ६ वाजता : रायगड विकास प्राधिकरणाद्वारे झालेल्या विकासकामांच्या चित्रांचे, गडावर सापडलेल्या ऐतिहासिक वस्तूंचे ‘सुवर्णक्षणांचे साक्षीदार’ प्रदर्शनाचे हत्तीखाना येथे उद्घाटन.सायंकाळी ७ वाजता : ‘गतवैभव रायगडाचे कार्य विकास प्राधिकरणाचे’ याबाबत सादरीकरणरात्री ९ वाजता : जिल्हा परिषद धर्मशाळा येथे अन्नछत्राचे उद्घाटन. गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ. ही रात्र शाहिरांची कार्यक्रम.रात्री ९.३० वाजता : जगदीश्वराच्या वारकरी संप्रदायाकडून कीर्तन, जागर, काकडआरती.
गुरुवारी सकाळी ६ वाजता : नगारखाना येथे ध्वजपूजन, ध्वजारोहण.सकाळी ६.५० वाजता : शाहिरी कार्यक्रम.सकाळी ९.३० वाजता : राजसदर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन.सकाळी १०.१० वाजता : खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक.सकाळी १०.२० वाजता : मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेकसकाळी ११ वाजता : ‘सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा’ या मुख्य पालखी सोहळ्यास प्रारंभदुपारी १२ वाजता : जगदीश्वराचे दर्शन घेऊन पालखी सोहळ्याचा समारोप.