दुर्गराज रायगड उजळला एलईडी दिव्यांनी; शिवभक्त सुखावले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 04:20 AM2019-06-06T04:20:04+5:302019-06-06T04:20:19+5:30
रात्रीच्या वेळेस अनुभवता येणार किल्ल्याचे सौंदर्य
महाड : अवघ्या महाराष्ट्राचा मानबिंदू आणि अभिमान असलेला किल्ले रायगड एलईडी दिव्यांनी उजळून निघाला आहे. विशेष म्हणजे, रायगड प्रधिकरणाच्या माध्यमातून ही व्यवस्था कायमस्वरूपी केल्याने आता शिवभक्तांना रायगडचे सौंदर्य रात्रीच्या वेळेस अनुभवता येणार आहे.
रायगड प्रधिकरणाच्या माध्यमातून प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली गड संवर्धनाचे काम वेगाने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून किल्ले रायगड आणि परिसरात एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. महादरवाजा, खुबलढा बुरुज आणि चित्तदरवाजा या ठिकाणी हे दिवे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. ५ आणि ६ जून रोजी रायगडवर तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर काही प्रमुख ठिकाणी ही प्रकाश व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी रात्रीच्या वेळेस पायऱ्यांनी गडावर जाणाºया शिवभक्तांना अडचण येऊ नये म्हणून या पायरी मार्गावर प्रशासनाच्या वतीने ही तात्पुरती प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हा पायरी मार्गही उजळून निघाला आहे.
गडावर आढळून आलेल्या काही प्रमुख वास्तूंमध्येही प्रकाश व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती, रायगड प्रधिकरणाचे पुरातत्त्व अभियंता विशाल भामरे यांनी दिली. सध्या करण्यात आलेल्या प्रकाश व्यवस्थेबद्दल शिवभक्तांची मते जाणून घेण्यात येणार असून, त्यांच्या सूचनेनुसार पुढील काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.