ऐन थंडीच्या दिवसांत तळा शहरातील पाणीप्रश्न पेटला, स्थानिक नेत्यांमध्ये श्रेयवादावरून पाणीयुद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 12:07 AM2021-02-05T00:07:30+5:302021-02-05T00:08:08+5:30
Raigad News : ऐन थंडीच्या दिवसांत तळा शहरातील पाणीप्रश्न पेटला असून पाणी योजनेच्या श्रेयवादावरून स्थानिक नेत्यांमध्ये पाणीयुद्ध रंगल्याचे चित्र पहायला मिळाले.
तळा - शहरातील नगरपंचायत निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे शहरातील राजकारण तापत चालले आहे. ज्या पाणी योजनेच्या कमतरतेमुळे तळा शहर अनेक वर्षे मागे पडले आहे. त्या पाणीयोजनेला ३ फेब्रुवारी रोजी अखेर मंजुरी मिळाली. मात्र, या योजनेला मंजुरी मिळताच ऐन थंडीच्या दिवसांत तळा शहरातील पाणीप्रश्न पेटला असून पाणी योजनेच्या श्रेयवादावरून स्थानिक नेत्यांमध्ये पाणीयुद्ध रंगल्याचे चित्र पहायला मिळाले.
शिवसेना माजी जिल्हाप्रमुख व नुकतेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले रवी मुंढे व त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा रेश्मा मुंढे यांनी तळा शहरातील पाणीयोजना आमच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाली आहे असे म्हटले आहे. या योजनेच्या मंजुरीसाठी लागणारी विविध कागदपत्रे स्वतः जमा करून त्यांची पूर्तता केली आहे तसेच सुरुवातीपासून केलेल्या पाठपुराव्यामुळेच तळा शहराचा पाणीप्रश्न सुटला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी रवि मुंढे यांचे सर्व दावे खोडत ही योजना शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाली असल्याचा दावा केला आहे.
लवकरच या योजनेचे भूमिपूजन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असून पत्रकार परिषद घेऊन या योजनेसाठी आम्ही पाठपुरावा केला आहे, हे पुराव्यासह स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही आजी-माजी जिल्हाप्रमुखांमध्ये योजनेच्या श्रेयवादावरून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
नागरिकांमध्ये संभ्रम
नक्की ही योजना कोणाच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाली याबाबत शहरातील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. पाणी हा तळावासियांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि त्यांचा हा जिव्हाळ्याचा विषय ज्यांच्या माध्यमातून सोडविला गेला आहे, त्यांनाच नगरपंचायत निवडणुकीत कौल मिळण्याची शक्यता आहे.