कोरोना काळात कमी वजनाच्या तीन बालकांना मिळाले जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 11:47 PM2021-04-26T23:47:36+5:302021-04-26T23:47:55+5:30
अलिबागच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांचे यश
निखिल म्हात्रे
अलिबाग : अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक सुखद घटना समोर आली आहे. दोन मातांच्या तीन नवजात मुलांचे वजन अगदीच कमी असल्याने त्यांचा जीव धोक्यात होता. मात्र, बालरोगतज्ज्ञ या नवजात बालकांसाठी देवदूत ठरले आहेत.
डाॅक्टरांनी विविध शक्कल लढवून या तीनही बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आले. मागील एक महिन्याच्या देखरेखीनंतर ही बालके गुटगुटीत होऊन आपल्या आईच्या कुशीत विसावली आहेत.
अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात १९ मार्च रोजी माही जाधव (रा. विघवली माणगाव) या मातेने बाळाला जन्म दिला. मात्र, बालकाचे वजन अवघे ७०० ग्रॅम होते. त्याचबरोबर अलिबाग बंदरपाडा येथील रुबिना सिद्दीकी यांच्या नवजात जुळ्या मुलांचे वजन ९५५ ग्रॅम होते. त्यामुळे तातडीने या तीनही बाळांना नवजात शिशू कक्षात दाखल करण्यात आले.
डॉ. महालिंग क्षीरसागर, डॉ. सागर खेदू यांनी बालकांवर योग्य उपचार केले. डॉक्टर, परिचारिका महिनाभर मुलांची काळजी घेत होते. या सर्वांच्या मेहनतीला फळ आले आणि मुलांच्या प्रकृतीचा धोका टळला. काही ग्रॅमची ही बालके सव्वाकिलो वजनाची झाली.एक महिना बालकांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिका यांनी योग्य उपचार केल्याने महिनाभराने तीनही बालकांना घरी सोडण्यात आले. बालके कुशीत विसावल्यानंतर मातांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करीत डॉक्टरांचे आभार मानले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, डॉ. अनिल फुटाणे, डॉ. महालिंग क्षीरसागर, डॉ. सागर खेदू, परिचारिका उपस्थित होत्या.