जमीर काझी
अलिबाग : कोरोनाचे संकट व त्यानंतर विलिनीकरणाच्या मागणीसाठी दीर्घकाळ लांबलेल्या संपामुळे तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला (एस.टी.) बाप्पा पावला आहे. गणेशोत्सवाच्या काळात एसटीच्या रायगड विभागाने राज्यात सर्वाधिक प्रवाशांची वाहतूक करत पहिले स्थान पटकाविले आहे. ६०.८१ टक्के भारमान मिळवित ४.५६ कोटी उत्पन्न मिळविले आहे. ठाणे व लातूर विभाग अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.
गणेशोत्सवासाठी चाकरमाणी कोकणासह राज्यात आपापल्या गावी गेेले होते. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत जवळपास तिपटीने वाढ झाल्याचे महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. २७ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत एसटी महामंडळाने राज्यातील प्रत्येक विभागातून साध्या व शिवशाही बसेसच्या जादा फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामध्ये रायगड विभागातून राज्यात सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. या कालावधीत रायगड विभागात तब्बल १ कोटी १८ लाख ९ हजार ५०७ नागरिकांनी प्रवास केला होता. त्यांचे भारमान प्रमाण ६०.८१ टक्के इतके असून राज्यातील सर्व ३१ विभागांत ते सर्वाधिक ठरले आहे. त्यातून महामंडळाला एकुण ६ कोटी ५७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक असल्याने जादा बसेस व फेऱ्यांचे नियोजन केले होते. त्यामध्ये यश येऊन राज्यात सर्वाधिक भारमान रायगड विभागाला मिळाले. -अनघा बारटक्के ( नियंत्रक, रायगड परिवहन विभाग)
असे ठरते भारमानचे प्रमाणएसटी विभागातून एकूण सोडण्यात आलेल्या बसेस त्याचे फेऱ्या व त्यामध्ये असलेल्या आसन व्यवस्था आणि प्रवासाच्या संख्येवर भारमान निश्चित केले जाते. सीटच्या तुलनेत प्रवासी संख्या वाढल्यानंतर भारमान वाढून एसटीला फायदा होतो.