जेएसडब्ल्यूच्या चिमणीतून उठले धुळींचे लाेळ, धुराच्या वासाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 05:07 PM2020-07-29T17:07:29+5:302020-07-29T17:07:41+5:30
पेणसह अलिबाग तालुक्याच्या काही परिसरामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले हाेते. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
रायगड - पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या चिमणीमधून धुळमिश्रीत धुरांचे लाेळ बाहेर पडले. लाल रंगांच्या या धुराचा वास अतिशय असह्य करणारा हाेता. त्यामुळे पेणसह अलिबाग तालुक्याच्या काही परिसरामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले हाेते. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर आधीच जेएसडब्ल्यू स्टील कंपनीबाबत उलट-सुलट चर्चेचे रान उठले आहे. त्यातच कंपनीच्या चिमणीमधून अचानक लाल रंगाच्या धुराचे लाेळ उठल्याने परिसरातील नागरिक कमालीचे भयभीत झाले. सदरची घटना सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे पेण आणि अलिबाग तालुक्यातील दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु असल्याने रस्त्यावर, तसेच बाजार पेठांमध्ये गर्दी हाेती. त्याचप्रमाणे कंपनी परिसराच्या बाजूला माेठ्या संख्येने नागरी वस्ती देखील आहे. कंपनीच्या चिमणीमधून अचानक धुळीचे लाेळ पसरल्याने नागरिक कमालीचे भयभीत झाले. सदरच्या धुळ मिश्रीत धुरामुळे डाेळे चुरचुरत असल्याने कंपनीमधून विषारी वायू पसरला तर नाही ना अशी शंका नागरिकांमध्ये हाेती. सुमारे 20 मिनिटे चिमणीतून धुरांचे लाेळ आकाशाकडे झेपावत हाेते. त्यामुळे परिसरामध्ये काळाेख पसरला हाेता. आपल्या आजूबाजूला काेण आहे की नाही हेसुद्धा कळत नव्हते. सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले हाेते.
दाट पसरलेल्या धुरामुळे समोरचे दिसेनासे झाले होते. लालसर रंगाचा प्रचंड धूर आणि त्याच्या उग्र वासामुळे डोलवी, गडब, काराव, वडखळ, आमटेम, नवेगाव, वाशीसह परिसरातील शेकडो गावांतील नागरिकांना असह्य झाले होते. मात्र नेमके काय झाले? याबाबत काहीही माहिती नसल्याने नागरिकांमध्ये कमालीचे घबराटीचे वातावरण हाेते.
दरम्यान, जेएसडब्ल्यू कंपनीतील प्लांट शटडाऊन झाल्याने धुळीचे लोळ उठले हाेते. हा विषारी वायू नसल्याचे पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव यांनी स्पष्ट करुन आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. कंपनीमध्ये नेहमीप्रमाणे काम सुरु झाल्याचेही त्यांनी सांगितले.
नारायण बाेलबुंडा (जनसंपर्क अधिकारी, जेएसडब्ल्यू)
--------------------------
कंपनीमध्ये काेणतीही दुर्घटना घडलेली नाही.
सकाळी साडे अकराच्या सुमारास कंपनीच्या कोक ओव्हन प्लांटमध्ये इलेक्ट्रीक पाॅवर ट्रिप झाली. त्यामुळे काेक बनवण्याची प्रक्रीया बंद पडली आणि शटडाऊन हाेऊन मोठ्या प्रमाणात चिमणीमधून धुळीचे लाेळ बाहेर पडले. वातावरणात पसरलेला हा धुर विषारी नाही. प्लांट पूर्वत सुरु करण्यात आला आहे.