जनआरोग्य योजनेतील लाभार्थींना ई-कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 03:28 AM2018-09-25T03:28:50+5:302018-09-25T03:29:03+5:30
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेला कर्जतमध्ये सोमवारी सुरुवात झाली.
कर्जत : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेला कर्जतमध्ये सोमवारी सुरुवात झाली. योजनेचे राष्ट्रीय पातळीवर रांची येथे उद्घाटन होत असताना रायगड जिल्ह्याचा उद्घाटन सोहळा कर्जत येथील कृषी संशोधन केंद्रात पार पडला. दरम्यान, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जिल्ह्यातील एकूण १ लाख ४० हजार लाभार्थींपैकी प्रायोगिक तत्त्वावर ८ लाभार्थींना ई-कार्ड वाटप केले.
कर्जत येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत येथील केंद्रात जिल्हास्तरीय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, प्रांत अधिकारी वैशाली परदेशी यांच्यासह सिडको महामंडळाचे माजी संचालक वसंत भोईर, कर्जतच्या नगराध्यक्ष रजनी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देसाई यांनी प्रास्ताविकात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची माहिती करून दिली. रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यात ग्रामीण भागात १ लाख २० हजार ४८९ लाभार्थींचा समावेश असून नगरपालिका हद्दीत या योजनेत २० हजार ६२० लाभार्थींचा समावेश आहे. जिल्हास्तरीय जन आरोग्य योजनेचे उद्घाटन झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील जन आरोग्य योजनेबद्दल लाभार्थी असलेल्या आठ लाभार्थींना ई-कार्ड यांचे वाटप करण्यात आले. त्यात हेमलता हरिचंद्र माळवी, वंदना गोविंद गिरी, दत्ताराम धर्मा म्हात्रे, रेखा कृष्णा घोसाळकर, हुसना बंबीवले, रवी गुरु नाथ पवार, विवेक हरिचंद्र माळवी, कुसुम मारु ती गिरी यांना वाटप करण्यात आले. आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका,आरोग्यसेवक, आरोग्य कर्मचारी, आशासेविका,अंगणवाडी सेविका यांचे प्रशिक्षण जिल्हास्तरीय जन आरोग्य योजनेच्या उद्घाटन सोहळ्याआधी घेण्यात आले.
जन आरोग्य योजनेतून देशातील १० लाख कोटी कुटुंबांना आरोग्य कवच मिळाले आहे. त्याआधी बँकांशी काही संबंध नसलेल्या सर्व व्यक्तींना जनधन योजनेअंतर्गत बँकेशी जोडल्याचे चव्हाण यांनी सांगितले. कार्यक्र माला तालुक्याचे तहसीलदार अविनाश कोष्टी, तालुका गटविकास अधिकारी बाबाजी पुरी, आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे, मुख्याधिकारी रामदास कोकरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण कर्जतला लोकलने आले आणि त्यानंतर वेणगाव येथील श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कार्यक्र म स्थळी आले. कार्यक्र म झाल्यावर त्यांनी पळसदरी येथे जाऊन श्री स्वामी समर्थ मठात जाऊन दर्शन घेतले आणि ट्रेननेच डोंबिवलीला प्रस्थान केले.