जिल्हा नियोजन भवनचे ई-उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:45 AM2019-06-16T01:45:05+5:302019-06-16T01:45:24+5:30
मुख्यमंत्र्यांनी दिला व्हिडीओ संदेश; नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रस्तावास मान्यता देणार
अलिबाग : येथील जिल्हा नियोजन भवन या नवीन इमारतीचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई-उद्घाटन करण्यात आले. अलिबाग येथे जिल्हा प्रशासनाची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ५० कोटी रुपयांच्या प्रस्तावास लवकरच मान्यता देण्यात येणार असल्याचे त्यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून स्पष्ट केले.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य उपस्थित मान्यवरांनी कोनशीलेचे अनावरण केले. त्यानंतर फीत कापून सर्व मान्यवरांनी इमारतीत प्रवेश केला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तत्कालीन जिल्हा नियोजन अधिकारी राजेश तितर, इमारतीचे वास्तू विशारद परब आणि ठेकेदार अमित नारे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, खासदार सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार बाळराम पाटील, विधानसभा सदस्य आमदार सुरेश लाड, आमदार भरत गोगावले, आमदार धैर्यशील पाटील, आमदार सुभाष पाटील, आमदार मनोहर भोईर तसेच प्रभारी जिल्हाधिकारी भरत शितोळे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव व इतर उपस्थित होते.