ई-पीक पाहणी ठरतेय डोकेदुखी; ॲपममधील वेगवेगळे कॉलम भरताना शेतकऱ्यांना अडचणी
By निखिल म्हात्रे | Published: November 22, 2023 05:14 PM2023-11-22T17:14:21+5:302023-11-22T17:14:53+5:30
शेतात पेरलेल्या पिकांची नोंद शासन दरबारी अचूक व्हावी यासाठी ई-पीक पहाणी ॲप सुरू करण्यात आले आहे.
निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: शेतात पेरलेल्या पिकांची नोंद शासन दरबारी अचूक व्हावी यासाठी ई-पीक पहाणी ॲप सुरू करण्यात आले आहे. शेतकरी स्वतः शेतावर जाऊन पीक पेऱ्याची नोंद ऑनलाईनद्वारे करु शकतील, अशी सोय यात आहे. मात्र, प्रशिक्षणाअभावी ई-पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी बनू लागली आहे. ॲपममधील वेगवेगळे कॉलम भरताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत.
पूर्वी पीक पेऱ्याची नोंद तलाठ्यांमार्फत केली जात होती. शेतकऱ्यांना भेटून त्याच्या पीक पेऱ्याची माहिती घेतली जात होती. त्याचा परिणाम पीक पेऱ्यांच्या नोंदीवर होऊ लागला. नुकसानभरपाईचा लाभ पाहिजे त्या शेतकऱ्यांना मिळण्यास अडथळे येऊ लागले. त्यामुळे केंद्र सरकारने ऑनलाईन पद्धतीचा आधार घेत स्वतःहून पीक पेऱ्याची नोंद करण्याची सुविधा शेतकऱ्यांवर सोपविली. त्यासाठी ई-पीक पाहणी ॲप सुरु करण्यात आले आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात शेतावर जाऊन ॲपवर शेताचे छायाचित्र अपलोड करणे, दुबार पीक व अन्य पिकांची माहिती त्यात भरणे, सिंचन नोंद करणे, अशा अनेक प्रकारचे कॉलम त्यामध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. मात्र, सरकारी भाषेमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे कॉलम भरताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या ई-पीक पाहणीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे.
रायगड जिल्ह्यातील अनेक शेतजमिनी डोंगरदऱ्यांच्या जवळ असल्याने साधा मोबाईलद्वारे फोन लागणेदेखील कठीण असते. त्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा पोहोचली नसल्याने शेतकऱ्यांना ॲपवर ई-पीक पाहणीची नोंद करणे कठीण होऊन बसले असल्याच्या तक्रारीही निर्माण झाल्या आहेत.