डोलकाठीसाठी ढाक डोंगरावरून आणला गरुडध्वज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 01:15 AM2020-11-25T01:15:50+5:302020-11-25T01:16:03+5:30

कार्तिक पौर्णिमेचा उत्सव

The eagle flag was brought from Dhak hill for Dolkathi | डोलकाठीसाठी ढाक डोंगरावरून आणला गरुडध्वज

डोलकाठीसाठी ढाक डोंगरावरून आणला गरुडध्वज

Next

कर्जत : देऊळवाडी किरवली येथील कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी परंपरेनुसार डोलकाठीच्या टोकाला ढाक डोंगरावरील चढण्या-उतरण्यास अत्यंत कठीण असलेल्या भैरी मंदिरातून गरुडध्वज आणला. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे यात्रा रद्द करण्यात आली असून भाविकांना सर्व शासकीय नियम पाळून दर्शन घेता येणार आहे. सकाळी गरुडध्वजाची पूजा ट्रस्टचे अध्यक्ष किसन जैतू बडेकर यांच्या हस्ते मंदिरात करण्यात आली. त्यानंतर श्री ग्रामदेवी बहिरी तळई संस्थान, देऊळवाडी किरवलीचे सचिव दिलीप बडेकर, बिपीन बडेकर, प्रभाकर बडेकर, जीवन बडेकर, जनार्दन बडेकर, ज्ञानेश्वर जाधव आदी ग्रामस्थ गरुडध्वज आणण्यासाठी ढाक डोंगरावर गेले होते.

तो गरुडध्वज ढाक भैरी मंदिरात आणल्यानंतर गरुडध्वजाची पूजा पुरोहित गजानन उपाध्ये यांच्या हस्ते करून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर हे सारे भाविक मार्गस्थ झाले. हा गरुडध्वज देऊळवाडी येथे आणण्यात आला. हा ध्वज डोलकाठीच्या तुऱ्यावर बांधण्यात येणार आहे. त्यानंतर रविवारी ३० नोव्हेंबर रोजी ही डोलकाठी मंदिराजवळ उभी करण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेला या डोलकाठीच्या मोरपिसाऱ्याने शिवमंदिरातील शिवपिंडीला आरतीच्या वेळी वारा घालून ही तीस फूट उंचीची डोलकाठी हनुवटीवर, दातांवर, कपाळावर व हातावर ठेवून नाचविण्यात येते. हे दृश्य फारच रोमांचकारक असते. मात्र यंदा कोरोनाचे संकट असल्याने परंपरागत असलेली यात्रा रद्द केली असून भाविकांना शासकीय नियम पाळून दर्शन देण्यात येणार आहे. पालखी मिरवणुकीची परवानगी मिळाल्यास मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात येणार आहे.

यंदा कोरोनाच्या संकटामुळे यात्रा रद्द केली आहे. कोणत्याच प्रकारची दुकाने लावण्यात येणार नाहीत. मात्र दर्शनासाठी मंदिर खुले राहील. सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येणार असून भाविकांसाठी मास्क अनिवार्य असणार आहे. सुरक्षित अंतर ठेवूनच दर्शन दिले जाणार आहे. भाविकांनी सहकार्य करावे.
- दिलीप बडेकर, 
सचिव, श्री ग्रामदेवी 
बहिरी तळई संस्थान

Web Title: The eagle flag was brought from Dhak hill for Dolkathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड