पारगाव हिलवर अर्ली व्हॉर्निंग डिटेंशन सिस्टम
By वैभव गायकर | Published: July 13, 2024 02:18 PM2024-07-13T14:18:04+5:302024-07-13T14:21:45+5:30
500 मीटरच्या जागेत उभारल्या जाणाऱ्या जागेत यंत्रणेत लोखंडी जाळी देखील लावण्यात येणार आ
पनवेल - नजीकच्या काळात अतिवृष्टीमुळे भूस्खलनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे वित्तहानी तर होतेच अनेक निष्पापांना आपले जीव गमवावे लागत आहे. नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ परिसरात पुष्पकनोडला लागुन असलेल्या पारगाव हिलवर सिडकोच्या वतीने अर्ली व्हॉर्निंग डिटेंशन सिस्टम बसविण्यात येत आहे. या यंत्रणेमुळे या परिसरतील डोंगरावर काही हालचाली झाल्यास अथवा भूस्खलन होणार असल्यास त्याची माहीती या यंत्रणेद्वारे अगोदरच समजणार आहे.
500 मीटरच्या जागेत उभारल्या जाणाऱ्या जागेत यंत्रणेत लोखंडी जाळी देखील लावण्यात येणार आहे. 23 करोड खर्चून उभारल्या जाणारा प्रकल्प पुणे स्थित टेक्निकल हायबर्स या कंपनीमार्फत सिडको उभारत आहेत. पुष्पक नोडमध्ये नवी मुंबई परिसरातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. याठिकाणी प्रकल्पग्रस्तांना भूखंड देखील देऊ करण्यात आले आहेत. भविष्यात याठिकाणची लोकवस्ती झपाट्याने वाढणार असल्याने सिडको प्रशासनामार्फत सावधानता बाळगण्यासाठी हि यंत्रणा बसविण्यात येत आहे. या परीसरात यापूर्वी अनेक वेळा भूस्खलन झाले आहे त्यात जीवितहानी झाली नसली तरी भविष्यातयाबाबत उपाययोजना राबविणे काळाची गरज असल्याने सिडकोने हा निर्णय घेतला आहे.
पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात सह्याद्री पर्वतरांगाचे जाळे पसरले आहे. पनवेल ग्रामीण,खारघर हिल,पुष्पकनोड आदीठिकाणी या पर्वत रांगा पसरलेल्या आहेत. दरवर्षी पनवेमध्ये कुठेना कुठे? भूस्खलनाचे प्रकार घडत असतात. सिडकोने बसविलेली ही यंत्रणा यशस्वी ठरल्यास इतर ठिकाणी ही यंत्रणा बसवून भूस्खलद्वारे होणाऱ्या दुर्दैवी घटना टाळण्यास मदत होणार आहे.
अशी मिळणार माहिती
या यंत्रणेद्वारे डोंगरातील लहान लहान हालचालींची माहिती त्वरित एसएमएस द्वारे मिळणार आहे.याकरिता या सिस्टम मध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी,सिडकोचे नोडल अधिकारी अथवा इतर वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीला मिळणार आहे.यामुळे संबधित सतर्क होऊन पुढील घटना टाळण्याच्या दृष्टीने हालचाली करतील.पूर्वकल्पना मिळणार असल्याने या परिसरात त्वरित उपाययोजना राबवुन पुढील वित्तहाणी आणि जीवितहाणी टळणार आहे.
अर्ली व्हॉर्निंग डीटेंशन सिस्टमद्वारे पारगाव हिल परिसरात भूस्खलन होणार असल्यास त्याची आगाऊ माहिती मिळणार आहे.पुढील मोठी घटना टाळण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होणार असुन 500 मीटर जागेत हि व्हॉल उभारण्याचे काम सुरु आहे.
- चैतन्य घरत (सहाय्यक कार्यकारी अभियंता ,एअरपोर्ट -2 सिडको )