मातीचा दर्जा खालावतोय, संशोधकांचे निरीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 01:04 AM2018-12-05T01:04:03+5:302018-12-05T01:04:12+5:30
एक ग्रॅम माती (मृदा)निर्मितीसाठी २०० वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो.
अलिबाग : एक ग्रॅम माती (मृदा)निर्मितीसाठी २०० वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो. भरघोस आणि दर्जेदार पिकांचे उत्पादनासाठी माती सुपीक असणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या काही वर्षात मातीचा पर्यायाने शेतजमिनीचा दर्जा खालावत आहे.
जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये १९ हजार ७५९ मातीचे नमुने तपासण्यात आले. २०१८-१९ मध्ये ५ हजार ७७८ माती नमुन्यांपैकी ३ हजार ४३४ मातीचे नमुने तपासण्यात आले आहेत. यंदा ५७ हजार ७८० मातीच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट असून बुधवार,५ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांना हे वाटप करणार असल्याची माहिती जिल्हा मृद सर्वेक्षणातील चाचणी अधिकारी श्याम धर्माधिकारी यांनी दिली.
मातीचे नमुने तपासताना जमिनीतील आम्लविम्लनिर्देशांक (सामू), क्षारता, सेंद्रीय कर्ब, नत्र, स्फूरद, पालाश, गंधक, जस्त, बोरॉन, लोह, मँगनिज व तांबे या १२ घटकांची तपासणी करण्यात येते. त्याचे मातीतील क्षमतेवर प्रमाणपत्र दिले जाते. यंदा जागतिक मृदा दिनानिमित्त ‘मृदा प्रदूषणाचे उपाय व्हा!’असे घोषवाक्य तयार करण्यात आले आहे. गतवर्षी ‘पृथ्वीचे संरक्षण करू या, मातीच्या रक्षणाने’ असे घोषवाक्य तयार करण्यात आले होते.
पाऊस, नद्यांना पूर, उधाणभरती, त्सुनामी आदींमुळे पाण्याच्या प्रवाहाचे पाणी शिरल्याने जमीन नापीक होते. बेसुमार वृक्षतोड व चराऊ कुरणे नष्ट झाल्याने ओसाड जमिनींवरील मातीची वाºयाद्वारे धूप होते. त्याचबरोबरच शहरीकरण, औद्योगिकीकरण, रस्ते विकास या भौतिक कारणांमुळेही उत्खनन, धूप होते. याचा परिणाम मातीचा दर्जा खालावण्यावर होतो. वारंवार एकच पीक घेतल्यानेही मातीतील कस कमी होतो.
>भौगोलिक क्षेत्रफळापैकी ४२.५० टक्के जमीन नापिकी
‘जागतिक मृदा दिन’ आयोजित करण्यामागे संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेची भूमिका महत्त्वाची आहे. जगभरात मातीशी निगडित प्रश्न गंभीर आहेतच, पण भारतातील जमीन प्रदूषित होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत खूप वाढले आहे. भारताच्या ३२८.७३ दशलक्ष जमीन क्षेत्रफळापैकी १२०.४० दशलक्ष म्हणजे ३६ टक्के जमीन नापीक होत चालली आहे. पाणी व हवेमुळे देशात दरवर्षी ५.३ अरब टन सुपीक मातीची धूप होऊन ती नष्ट होत आहे.महाराष्ट्राच्या ३.०७ दशलक्ष भौगोलिक क्षेत्रफळापैकी सुमारे ४२.५० टक्के जमीन खराब वा नापिकी आहे. परिणामी राज्यातील १५९ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र दुष्काळग्रस्त आहे. राज्यातील सुमारे १४६ लाख हेक्टर क्षेत्रफळावर माती आणि पाणी संवर्धनाची गरज विचारात घेवून ‘पाणी अडवा,पाणी जिरवा’, यासारख्या पाणी व जमीन संवर्धनाच्या योजना अमलात आणाव्या लागल्या आहेत.
>मातीची गुणवत्ता बिघडण्याची कारणे
पाण्याचा अतिवापर, दुर्भिक्ष, रासायनिक खतांचा असंतुलित वापर,एकच एक पीक
वारंवार घेणे.
रासायनिक खतांच्या चुकीच्या पद्धतीने वापर
वा शिफारशीपेक्षा जास्त वापर.
शेतातील पाण्याचा निचरा न झाल्याने ते मुळाशी साचून राहते, परिणामी मुळांना हवा न मिळाल्याने वाढ खुंटते.
साचलेल्या पाण्यात मातीतील क्षार विरघळतात. सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने पाण्याचे बाष्पीभवन होवून पाण्यातील क्षार जमिनीत अडकतात.