मुरूडच्या रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 01:05 AM2020-10-01T01:05:14+5:302020-10-01T01:05:43+5:30
नागरिक हैराण : आंदोलन, उपोषण होऊनही परिस्थिती जैसे थे
बोर्लीमांडला : साळाव-मुरूड रस्ता तसेच मुरूड शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी सर्वपक्षीय आंदोलने झाली, उपोषणही झाले. मात्र रस्त्याची दुरवस्था जैसे थे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून साळाव-मुरूड-आगरदांडा तसेच शहरातील रस्ते पावसाळ्यात खाचखळगे व खड्डे पडल्याने खराब झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक, प्रवासी व नागरिकांना नित्याने त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संघटना, सर्वपक्षीयांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम खाते व नगर परिषदेला वेळोवेळी विनंती निवेदने दिली, मागणी करण्यात आली.
वादळी पावसामुळे साळाव-मुरूड-आगरदांडा तसेच शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते तसेच संबंधित नगर परिषदेला नागरिकांनी वेळोवेळी निवेदने देऊन विनंती केली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी, रिक्षाचालकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. आजही रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वेळप्रसंगी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या दुरवस्थेकडे लोकप्रतिनिधींचीदेखील ठोस भूमिका दिसून येत नसल्याचे बोलले जाते आहे. परिणामी, आजही वाहनचालक, प्रवासी व नागरिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.