पर्यावरणपूरक ब्रेड बास्केट स्वित्झर्लंडला रवाना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:34 PM2019-01-16T23:34:13+5:302019-01-16T23:34:19+5:30
कोतवालवाडी ट्रस्टला मिळाली होती ऑर्डर : मकरसंक्रांत झाली गोड
- कांता हाबळे
नेरळ : नेरळमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या कोतवालवाडी ट्रस्टमध्ये महिलांना रोजगारनिर्मिती करण्यासाठी वेगवेगळे उपक्र म राबविले जातात. महिला विकास केंद्राला सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रेड बास्केट बनविण्याची आॅर्डर मिळाली होती. कोणत्याही प्रशिक्षणाविना पर्यावरणपूरक बास्केट बनविले असून ५० बास्केट परदेशी रवाना झाले आहेत. दरम्यान, स्वित्झर्लंडसारख्या पर्यटनावर अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या देशात नेरळच्या कोतवालवाडीमध्ये बनविलेल्या बास्केट पोहोचल्या आहेत.
नेरळ येथे ५० एकर जागेवर स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे यांनी कोतवालवाडी ट्रस्ट स्थापन केली. त्या ठिकाणी आदिवासी आणि समाजातील खालच्या थरातील वर्गाला मुख्य वर्गात आणण्यासाठी अनेक उपक्र म राबविले जातात. त्यात महिलांचे अनेक उपक्र म राबविले जातात. येथे महिला विकास केंद्राच्या माध्यमातून शिवणकला केंद्र चालविले जात असून कापडी आणि कागदी अशा पर्यावरणपूरक पिशव्या बनवून गरजू महिलांच्या हाताला काम दिले जाते. कोतवालवाडी ट्रस्टची वेबसाइट असल्याने परदेशातूनदेखील या संस्थेत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचे कौतुक होत असते. त्यात गतवर्षी स्वित्झर्लंडमधील महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा प्रिया आपटे या कोतवालवाडी ट्रस्टमध्ये आल्या होत्या, त्यांनी सोशल मीडियावर या बाबत माहिती दिली होती, त्यांनर कोतवालवाडी ट्रस्टला १० दिवसांपूर्वी पर्यावरणपूरक ब्रेड बास्केट बनविण्याची मोठी आॅर्डर मिळाली. मात्र, कापडावर कलाकुसर करून ते ब्रेड बास्केट कमी वेळेत बनविणे शक्य नसल्याने ५० बास्केट बनवून देण्याची जबाबदारी कोतवालवाडी ट्रस्टच्या वतीने संस्थेचे व्यवस्थापकीय संचालिका अनसूया पादिर आणि महिला विकास केंद्राची जबाबदारी सांभाळणाºया विश्वस्त संध्या देवस्थळे यांनी उचलली.
जागतिक बाजारपेठेत आणि तीही जगात सर्वाधिक पयटक पर्यटनासाठी जात असलेल्या स्वित्झर्लंड सारख्या देशात पाठवायची म्हणून महिला विकास केंद्रातील प्रशिक्षक अंजू पारधी, अंजना तिखंडे, रोहिणी झुगरे यांनी विश्वस्त देवस्थळे यांच्यासोबत काही प्रात्यक्षिके पाहिली आणि काम सुरू झाले. स्पंज आणि कॅनव्हास यांचा वापर करून सुती कापडाचा वापर करून आधी शिवणकाम आणि नंतर त्यावर कलाकुसर करून ५० ब्रेड बास्केट तयार केल्या. १५ जानेवारी रोजी मकरसंक्रांत असल्याने आपल्या महाराष्ट्र मंडळात संक्रांतीचे वाण द्यायचे असल्याने कोतवालवाडी ट्रस्ट मधून दोन दिवसांपूर्वी पर्यावरणपूरक ब्रेड बास्केट स्वित्झर्लंडसाठी रवाना केल्या आहेत.