- अनंत पाटीलनवी मुंबई : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुलून गेल्या आहेत. विविध रंगी आकाशकंदील ग्राहकांना आकर्षित करीत आहेत; परंतु खाडीकिनारी असलेल्या पाण्यातील वेताच्या काड्या वापर करून रंगबिरंगी पर्यावरणपूरक आकाशकंदील सध्या शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी परप्रांतातून आलेल्या या कारागिरांनी दिवाळीच्या मुहूर्तावर शहरात तळ ठोकला आहे. त्यापैकी काहींनी ठाणे-बेलापूर महामार्गावर घणसोली नाका येथे आपले बस्तान ठोकले आहे. त्यांनी तयार केलेल्या इकोफ्रेंडली आकाशकंदिलांना ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे.
प्लास्टिकबंदीचा परिणाम वाशीच्या एपीएमसी बाजारपेठेतही जाणवत आहे. त्यामुळे प्लास्टिक कंदील खरेदीसाठी ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. याचा नेमका फायदा पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली आकाशकंदील तयार करणाऱ्या कारागिरांना झाला आहे.
आंध्रप्रदेशातून आलेल्या या कारागिरांनी घणसोली नाका येथे रस्त्याच्या कडेला आपला संसार थाटला आहे. हे कारागीर वेताच्या काड्यापासून आकर्षक आकाशकंदील तयार करीत आहेत. तसेच त्यांनी तयार केलेल्या विविध आकाराच्या आकाशकंदिलासह आकर्षक फुलदाण्या, टोपल्या, टिपॉय तसेच किचनमध्ये वापरण्यात येणाºया सुबक टोपल्यांना शहरवासीयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या इकोफ्रेंडली वस्तू १०० रुपये ते १५०० रुपयांना उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या सणाची घरोघरी तयारी सुरू झाली आहे. खरेदीलाही वेग आला आहे. रांगोळी, नवे कपडे यांसह आकाशकंदील निवडण्यासाठी ग्राहक गर्दी करताना दिसत आहे. दरवर्षीप्रमाणे पारंपरिक कंदिलांनी बाजारपेठ फुलली असली तरी वेताच्या कंदिलांना पसंती मिळत आहे.