जंजिरा किल्ल्यामुळे लाभले आर्थिक स्थैर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:15 PM2018-10-15T23:15:08+5:302018-10-15T23:15:30+5:30
शिडांच्या बोटीमुळे शेकडो रोजगार : लघुउद्योगासह, स्थानिक व्यवसाय तेजीत
- संजय करडे
मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यातील ऐतिहासिक सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या बोटींचा उपयोग केला जातो. या बोटींच्या वाहतुकीमुळे स्थानिकांना रोजगार मिळाला आहे.
देश-विदेशातील जवळपास ५ लाख पर्यटक मुरुड, जंजिरा परिसरात फिरण्यासाठी येतात. पावसाळा वगळता वर्षभर याठिकाणी शिडाच्या बोटींतून प्रवासी वाहतूक सुरू असते. राजपुरी जेट्टीवरून अवघ्या २० मिनिटात शिडाच्या बोटीने किल्ल्यावर पोहचता येते. किल्ल्याच्या पायथ्याशी या बोटी थांबतात. सध्या जंजिरा किल्ल्यावर जाण्याचे व येण्याचे असे ६१ रु पये आकारले जातात. यामधून महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डास प्रत्येक प्रवाशाच्या मागे १० रुपये लेव्हीच्या मार्गे उत्पन्न मिळत आहे. किल्ल्यावर सुटीचे व शनिवार, रविवारी वर्षभर गर्दी असते. पर्यटकांच्या आगमनामुळे राजपुरी हे गाव नेहमी गजबजलेले असते. असंख्य गाड्या व जंजिरा किल्ला पाहण्यासाठी लागणारी लांबच लांब रांगा येथे नेहमीच पहावयास मिळतात. गाड्या पार्किंगचा ठेका सुद्धा स्थानिक लोकांना मिळाल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला आहे. पर्यटकांच्या आगमनामुळे स्थानिकांचे विविध व्यवसायही वृद्धिंगत होत आहेत. जंजिरा किल्ल्यामुळे राजपुरीतील खानावळी, हॉटेल व्यवसाय, किरकोळ विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले असून आर्थिक स्थैर्य लाभले आहे.
पर्यटक वाढल्याने राजपुरीतील युवकांना मोठा रोजगार प्राप्त झाला आहे. आज शेकडो कुटुंबे शिडाच्या बोटीची सेवा देऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. फक्त पावसाळ्याचे चार महिने वगळता इतर आठही महिने हे फार गर्दीचे असतात. औरंगाबाद, पुणे, परभणी, बीड, उस्मानाबाद, नागपूर आदी विविध भागातून विद्यार्थ्यांच्या सहली, तसेच विविध नागरिक हा किल्ला पाहण्यासाठी येतात. वर्षाला पाच लाखांपेक्षा जास्त पर्यटक हा किल्ला पाहावयास आल्याने स्थानिक युवकांची बेरोजगारी संपुष्टात आली आहे.
जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना पोहचवण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने जंजिरा पर्यटक सहकारी संस्था मर्यादित राजपुरी व वेलकम पर्यटक सेवा सहकारी संस्था राजपुरी यांना ठेका दिला आहे. यातील जंजिरा पर्यटक सहकारी संस्था मर्यादित ही सर्वात जुनी संस्था असून अगदी किल्ल्याच्या सुरुवातीपासून सेवा देत आहे. संस्थेच्या १३ शिडांच्या बोटी आहेत. प्रत्येक बोटीवर सहा माणसे कार्यरत आहेत. तसेच या बोटींवर तज्ज्ञ मार्गदर्शक नियुक्त आहेत.
वेगाने वाहणारे वारे किंवा तीव्र गतीने वाहणारे पाणी अशा कठीण समयी बोट सुखरूप किनाऱ्यावर आणण्यासाठी अशा मार्गदर्शकांचा उपयोग होत असतो. असे या संस्थेत सुमारे ९० लोक कार्यरत आहेत. तर वेलकम पर्यटक सेवा सहकारी संस्था यांच्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे. म्हणजेच या दोन्ही संस्थेत शंभरपेक्षा जास्त युवक वर्ग काम करीत असल्याने येथील बेरोजगारीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे.