चार दिवसांपूर्वी ‘ईडी’चे पथक अलिबागमध्ये? खा. राऊत यांच्यावरील कारवाईनंतर चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 10:20 AM2022-04-06T10:20:23+5:302022-04-06T10:20:28+5:30
नांदाईचा पाडातील खासदार संजय राऊत यांच्या बंगल्यावर मंगळवारी ‘ईडी’ने कारवाई केल्याची चर्चा पसरली हाेती. मात्र राऊत यांच्या अलिबाग अगरसुरे, किहीम, नांदाईचा पाड्यावरील बंगल्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही.
- निखिल म्हात्रे
अलिबाग : नांदाईचा पाडातील खासदार संजय राऊत यांच्या बंगल्यावर मंगळवारी ‘ईडी’ने कारवाई केल्याची चर्चा पसरली हाेती. मात्र राऊत यांच्या अलिबाग अगरसुरे, किहीम, नांदाईचा पाड्यावरील बंगल्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. तेथे नोटीस किंवा टाळे लावण्यात आलेले नव्हते, असे प्रत्यक्ष पाहणीत स्पष्ट झाले.
काही दिवसापूर्वी वर्षा राऊत यांच्या प्राॅपर्टीच्या पाहणीसाठी ‘ईडी’चे पथक अलिबागमध्ये येऊन गेल्याची स्थानिकांमध्ये चर्चा रंगली होती.
अलिबाग येथील किहीम समुद्रकिनाऱ्यावरील आठ भूखंड संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत आणि निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर यांच्या नावे खरेदी करण्यात आले.
या जमिनीच्या व्यवहारात नोंदणीकृत मूल्याव्यतिरिक्त विक्रेत्यांना रोख रक्कम देण्यात आली. प्रवीण राऊत यांच्या इतर मालमत्तेची ओळख पटल्यानंतर प्रवीण राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सर्व मालमत्ता जप्त करणारा तात्पुरता संलग्नक आदेश जारी करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात या प्राॅपर्टीवर कोणती कारवाई झाल्याची नोंद सरकार दरबारी नाही.
माध्यमांकडून प्रश्नांची सरबत्ती
माध्यमांच्या प्रतिनिधींनी नांदाईचा पाडा येथील काही संपत्तीवर कोणती कारवाई झाली आहे का? अशी विचारणा येथील कोतवाल यांच्याकडे केली होती.
मात्र, कोतवाल यांनी येथे कोणतीच कारवाई झाली नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही वेळातच कारवाई झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र, वास्तविक पाहता खासदार संजय राऊत यांच्या बंगल्यावर कोणतीच कारवाई झालेली नव्हती.