एसटी बंद झाल्याने शैक्षणिक नुकसान; नेरळ-ओलमण बस पुन्हा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:46 PM2019-05-13T23:46:49+5:302019-05-13T23:47:05+5:30
कर्जत आगारातून ओलमण गावासाठी एसटी चालविण्यात येत होती. मात्र सध्या ही गाडी बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, तसेच कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
- कांता हाबळे
नेरळ : कर्जत आगारातून ओलमण गावासाठी एसटी चालविण्यात येत होती. मात्र सध्या ही गाडी बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, तसेच कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे परिसरातील गावे, आदिवासी वाड्यांतील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. नेरळ-ओलमण एसटी पुन्हा सुरू व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
कर्जतचे पहिले आमदार मनोहर पादिर यांच्या प्रयत्नाने ओलमण - नेरळ ही आदिवासी भागासाठी जीवनदायिनी ठरलेली बससेवा गेल्या ३० वर्षांपासून नियमित सुरू होती. परंतु आठ दिवसांपासून ही बससेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे ओलमण, कळंब, साळोख, चई या आदिवासी भागातील ओलमण, तेलंगवाडी, बोंडेशेत,पेंढरी, भोपळेवाडी, कोतवालवाडी, झुगरेवाडी, बोरीचीवाडी, भागुचीवाडी, बनाचीवाडी, पादिरवाडी, चाहुचीवाडी, मिरचुलवाडी, एकनाथवाडी, नारळाचीवाडी, तळ्याचीवाडी(भागुचीवाडी), तसेच पाठगाव पठार परिसरातील असंख्य वाड्या वस्तीवरील ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. या आदिवासीवाडींतील अनेक शालेय विद्यार्थी पोशिर, नेरळ, कर्जत, बदलापूर येथे शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात. याशिवाय परिसरातील नागरिक, स्थानिक व्यावसायिक, रानमेवा, भाजीवाला विक्रेते, मोलमजुरीसाठी, रोजगारासाठी नेरळ, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, ठाणे परिसरात बसनेच प्रवास करतात. बससेवा बंद झाल्याने व वाहतुकीसाठी अन्य सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, शिवाय परिसरातील कामगार, मोलमजुरी करणाऱ्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे.
ओलमण- नेरळ बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी सरसावले आहेत. त्यांनी कर्जत एसटी आगाराचे प्रमुख यादव यांना याप्रकरणी निवेदन दिले असून बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.
९ जुलै १९८७ रोजी ओलमणसाठी एसटी सुरू झाली होती, पूर्वी दररोज एक वस्तीची गाडी तसेच दिवसभरात गाडीच्या चार फेºया होत होत्या. खासगी गाड्यांची वाहतूक या ठिकाणी नसल्याने एसटी हाच वाहतुकीचा पर्याय आहे. त्यामुळे ही बससेवा पुन्हा सुरू व्हावी.
- दादा पादिर, माजी सरपंच