माणगावची शैक्षणिक भरारी
By admin | Published: April 7, 2016 01:25 AM2016-04-07T01:25:25+5:302016-04-07T01:25:25+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्याने उत्तुंग शैक्षणिक भरारी घेतली आहे. या तालुक्यातील ३१० पैकी १०० शाळा २०१५-१६ मध्ये प्रगत झाल्या आहेत.
नितीन देशमुख, माणगाव
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्याने उत्तुंग शैक्षणिक भरारी घेतली आहे. या तालुक्यातील ३१० पैकी १०० शाळा २०१५-१६ मध्ये प्रगत झाल्या आहेत. ३० शाळा डिजिटल झाल्या आहेत. १५ एप्रिलपर्यंत १०० टक्के शाळा डिजिटल होतील, असा विश्वास गट शिक्षण अधिकाऱ्यांना आहे.
यापूर्वी आपण वर्तनवादी पद्धतीने शिकवत होतो. प्राण्याच्या वर्तनाचा अभ्यास करून मुलांना शिकवत होतो. त्यामुळे म्हणावी तशी प्रगती होत नव्हती. यासाठी नवीन पद्धत आणण्यात आली. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजना म्हणजेच लोकसहभागातून शासकीय अनुदान न घेता ज्ञानरचनावाद पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणे. या अंतर्गत माणगाव तालुक्यात आतापर्यंत १०० शाळा पूर्ण प्रगत झाल्या आहेत. शाळाबाह्य मुलांना शाळेत येण्यासाठी आकर्षण निर्माण व्हावे, मुलांना अभ्यासाची आवड निर्माण व्हावी, अशा पद्धतीने याची रचना करण्यात आली आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ एडगर डेल यांच्या म्हणण्याप्रमाणे वाचलेले १० टक्के लक्षात राहते, तर २० टक्के ऐकलेले, ३० टक्के पाहिलेले, ५० टक्के ऐकलेले व पाहिलेले, ७० टक्के बोललेले व ९० टक्के ग्रुपमध्ये चर्चा केलेले. या त्रिकोणाच्या सिद्धांताचा वापर या पद्धतीत केला आहे. अमेरिका व जपान या प्रगत देशांत ही पद्धत आधीपासून वापरण्यात येत आहे.
विद्यार्थ्याला अडचण निर्माण झाल्यास समवयस्कर विद्यार्थी त्याला मदत करतात. शिक्षक विविध साहित्याचा वापर करून शिकवतात. त्यामुळे एका शब्दापासून अनेक शब्द कसे बनवायचे, वाक्ये कशी बनवायची हे चांगले समजते. केंद्रप्रमुख सूर्यवंशी सांगतात, साखळेची वाडी या दुर्गम भागातील विद्यार्थी इंग्लिशमधून भाषण करू लागले आहेत. मुलांना बहुपर्यायी उत्तरे येऊ लागली. वावोशी शाळेतील दुसरीतल्या मुली कोटीपर्यंतची संख्या वाचू लागल्या.