अवकाळी पावसाचा आंबा विक्रीवर परिणाम 

By निखिल म्हात्रे | Published: May 18, 2024 12:21 PM2024-05-18T12:21:04+5:302024-05-18T12:21:22+5:30

जिल्ह्यात सुमारे दीड लाख शेतकरी आंबा उत्पादक आहे. दरवर्षी आंबा विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.

Effect of unseasonal rain on mango sales raigad | अवकाळी पावसाचा आंबा विक्रीवर परिणाम 

अवकाळी पावसाचा आंबा विक्रीवर परिणाम 

लोकमत न्युज नेटवर्क 
अलिबाग - दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील आंबा पिकावर बसला. तयार होण्याच्या मार्गावर असलेला आंबा अवकाळी पावसामुळे खराब झाला. काही ठिकाणी आंबे गळून पडले आहेत. एकतर यंदा रायगड जिल्ह्यातील हापूस आंबा बाजारात उशिरा आला आहे. त्याचा परिणाम आंबा विक्रीवर झाला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 14 हजार हेक्टर आंब्याचे क्षेत्र असून, 12 हजार हेक्टर उत्पादनाचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात सुमारे दीड लाख शेतकरी आंबा उत्पादक आहे. दरवर्षी आंबा विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यंदा सुरुवातीला आंब्यासाठी वातावरण पोषक होते. आंब्याला मोहोर येऊन कैर्‍यादेखील तयार होण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. परंतु, मार्च महिन्यात काही ठिकाणी तुडतुड्या रोगाचा प्रदुर्भाव आंब्यावर पडला. दोन दिवस अवकाळी पाऊस पडला.

त्यामुळे बाजारात येणारा रायगड जिल्ह्यातील आंबा उशिरा दाखल होण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 30 टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी व्यक्त केले आहे. प्रामुख्याने एप्रिल ते मेच्या दरम्यान खवय्यांना कमी दराने आंबा खरेदी करायला मिळतो. परंतु, यावर्षी हापूस आंब्याचे दर चढते पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रायगडमधील हापूस आंब्याचा तुटवडा भासत असल्याने सध्या आंब्याच्या पेटीच्या दर हे 2000 ते 2500 विकली जात आहे. होलसेल बाजारात आंबा खवय्यांना आकारानुसार 500 पेक्षा अधिक रुपये दोन डझनसाठी किंमत मोजावी लागत आहे. 

यंदा आंबा उत्पादनावर अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. बाजारात रायगड जिल्ह्यातील आंबा उशिरा दाखल होऊ लागला आहे. त्यामुळे आंब्याचे दर वाढण्याची भीती आहे. आंबा विक्रीवर तीस टक्क्यांपेक्षा अधिक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
- चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ.

आंब्याचे उत्पादन समाधानकारक होते. आंबा काढणीच्या तयारीत असताना अचानक अवकाळी पाऊस जिल्ह्यातील अनेक भागात कोसळला. वाऱ्या पावसामुळे आंब्यांना गळती लागली. त्याचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. रुळे, पवेळेसह अनेक गावांमधील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करावी.
- राम पाटील, आंबा उत्पादक.

Web Title: Effect of unseasonal rain on mango sales raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mangoआंबा