अलिबाग : मत्स्यव्यवसाय विभागाला कृषीचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी केंद्राने निधीही वाढवून दिला आहे. राज्यात ४५६ मच्छीमार गावे असून त्यातील ८१ हजार ४०० कुटुंबे हे मच्छीमारीच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. या पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना मासेमारीचे आधुनिक प्रशिक्षण मिळाले तर त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी शनिवारी येथे बोलताना व्यक्त केला आहे.
शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अलिबाग येथील नियोजित मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन जानकर यांच्या हस्ते कोनशीला अनावरण व कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.
जानकर म्हणाले, महाराष्ट्राचा मत्स्यउत्पादनात देशात सातवा क्र मांक होता तो या वर्षी चौथा आला आहे. त्यासाठी मच्छीमार जेटींची संख्या वाढविणे, केज फिशरीला चालना देणे, तसेच प्रशिक्षण देणे या गोष्टींना चालना देण्यात येत आहे. मत्स्यव्यवसायाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या युवकांना अन्य तांत्रिक बाबींचेही कौशल्य विकास विभागामार्फत प्रशिक्षण देण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. त्या दृष्टीने अलिबाग येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र हे अधिकाधिक आदर्शवत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जानकर यांनी या वेळी सांगितले. आ. सुभाष पाटील, मत्स्यव्यवसाय आयुक्त अरु ण विधळे, सहआयुक्त मत्स्यव्यवसाय विनोद नाईक, कार्यकारी अभियंता आर. एस. मोरे, प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय युवराज चौगले, रायगडचे सहआयुक्त मत्स्यव्यवसाय अभियसिंह शिंदे-इनामदार, वर्सोवा मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे प्रदीप जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. सुभाष पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्र माचे प्रास्ताविक सह आयुक्त मत्स्यव्यवसाय विनोद नाईक यांनी केले. तर मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राबाबत व मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती मत्स्यव्यवसाय आयुक्त अरु ण विधळे यांनी दिली. सह आयुक्त मत्स्यव्यवसाय अभियत्यांसह शिंदे इनामदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.