अलिबाग : महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबोल करून २४ तास उलटले नसतानाच सब स्टेशनमधील दुरुस्तीसाठी अलिबागमधीलवीजपुरवठा तब्बल आठ तासांसाठी खंडित करण्यात आला. वीज गायब झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले, शिवाय व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे महावितरणच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.अलिबाग सब स्टेशनमध्ये दुरुस्तीसाठी आठ तासांचे भारनियमन घेण्यात आले आहे आणि हे शेवटचे भारनियमन असेल, असा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. पावसाला सुरुवात होण्याआधी दर मंगळवारी महावितरणकडून भारनियमन केले जायचे. या कालावधीत दुरुस्तीची सर्व कामे करण्यात आली. यात वीजवाहक तारा बदलणे, गंजलेले खांब बदलणे, डीपीची दुरुस्ती करणे यासह अन्य तांत्रिक कामांचा समावेश होतो. दर मंगळवारी दुरुस्तीच्या नावावर भारनियमन घेतले जात असेल तर दुरुस्तीची कामे सातत्याने का केली जातात असा प्रश्न आहे. सातत्याने वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.अलिबाग तालुक्यातील शिवसेनेच्या माध्यमातून सोमवारी महावितरणवर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी महावितरणच्या अधिकाºयांना घेराव घालून जाब विचारण्यात आला. पुढील काही दिवसात विजेची समस्या उद्भवणार नाही, अशी हमी महावितरणने शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजा केणी यांच्यासोबत असलेल्या शिष्टमंडळाला दिली. मात्र, शिवसेनेने आंदोलन करून २४ तास उलटत नाहीत तोच महावितरणने मंगळवारी आठ तासांचे भारनियमन घेतले. त्यामुळे नागरिकांना पुन्हा त्रास सहन करावा लागला.अलिबाग सबस्टेशनमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने तातडीचे आणि शेवटचे भारनियमन घेण्यात आले आहे. युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होईल.- विशाल सूर्यवंशी, अधिकारी, महावितरणसध्या पाऊस चांगलाच बरसत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांनीही जोर धरला आहे. शेतीच्या कामांसाठी पैशाची गरज असते. बँकेतून कर्ज काढण्यासाठी सात-बारा उताºयाची आवश्यकता असते; परंतु वीजच गायब असल्याने आॅनलाइन सात-बारा उतारा मिळणे कठीण झाले आहे.- शैलेश काशिनाथ पाटील, शेतकरी, अलिबाग
अलिबाग शहरामध्ये आठ तास वीज खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:43 AM