उत्पादन शुल्क विभागाकडून आठ लाखांचे मद्य जप्त, दीड लाखाची रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 02:42 AM2019-10-01T02:42:37+5:302019-10-01T02:42:59+5:30
विधानसभा निवडणूकीची आचार संहीता जाहीर झाल्यापासून रायगड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ६१ ठिकाणी गुन्हे दाखल करून आठ लाख २० हजार ३०६ रु पयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अलिबाग : विधानसभा निवडणूकीची आचार संहीता जाहीर झाल्यापासून रायगड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ६१ ठिकाणी गुन्हे दाखल करून आठ लाख २० हजार ३०६ रु पयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एक लाख ४२ हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. याशिवाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १४ हजार ३२३ पोस्टर, होर्डिंग, बॅनर्स, फ्लेक्स काढून टाकण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
पनवेल, कर्जत या विधानसभा मतदार संघासाठी विनोद कुमार यांची नियुक्ती झाली. पनवेलमध्ये ११ आॅक्टोबरला पहिली खर्च ताळमेळ बैठक, १४ आॅक्टोबरला दुसरी आणि १८ आॅक्टोबरला तिसरी खर्च ताळमेळ बैठक घेणार आहेत. तर कर्जतमध्ये १० आॅक्टोबरला पहिली , १३ आॅक्टोबरला दुसरी तर १७ आॅक्टोबरला तिसरी बैठक होणार आहे. उरण, पेण या विधानसभा मतदार संघासाठी के. सुनिल कुमार नायर यांची नियुक्ती झाली आहे. ते उरणमध्ये १० आॅक्टोबरला पहिली खर्च ताळमेळ बैठक, १४ आॅक्टोबरला दुसरी तर १८ आॅक्टोबरला तिसरी बैठक घेणार आहेत. पेणमध्ये ११ आॅक्टोबरला पहिली खर्च ताळमेळ बैठक, १५ आॅक्टोबरला दुसरी आणि १९ आॅक्टोबरला तिसरी खर्च ताळमेळ बैठक घेणार आहेत.
अलिबाग, श्रीवर्धन, महाड या मतदार संघासाठी श्रीबास नाथ यांची नियुक्ती झाली आहे. अलिबाग मध्ये १० आॅक्टोबरला पहिली खर्च ताळमेळ बैठक, १४ आॅक्टोबरला दुसरी आणि १८ आॅक्टोबरला तिसरी बैठक घेणार आहेत. श्रीवर्धनमध्ये ९ आॅक्टोबरला पहिली खर्च ताळमेळ बैठक, १२ आॅक्टोबरला दुसरी आणि १६ आॅक्टोबरला तिसरी बैठक आहे.
प्रशिक्षणास गैरहजर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार
विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणाला गैरहजर असणा-या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार व निवडणूक संचालनासंबंधी कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी दिली.
रायगड जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्र म जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघात एकूण २,७१४ मतदान केंद्रावर २१ आॅक्टोबर, २०१९ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी एकूण १३ हजार ६०० कर्मचाºयांना मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी, अन्य मतदान अधिकारी या प्रमाणे जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे, सर्व कर्मचारी यांना आदेश बजावण्यात आले आहेत.
सर्व मतदान कर्मचाºयांचे निवडणूक कामकाज विषयक प्रथम प्रशिक्षण विधानसभा मतदारसंघ निहाय २८ सप्टेंबर, २०१९ रोजी आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी सर्व नियुक्त मतदान कर्मचारी यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते, परंतु एकूण १,२७७ मतदान कर्मचारी प्रथम प्रशिक्षणास गैरहजर असल्याचे आढळून आले आहे. या १,२७७ कर्मचाºयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
१ आॅक्टोबर, २०१९ रोजी विधानसभा मतदार संघातील निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात त्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. उपस्थित न होणाºया कर्मचाºया विरु द्ध कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.
समाज माध्यमांवरही बंधने
विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची (जनरल) नियुक्ती करण्यात आली आहे. पनवेल, कर्जतसाठी रेणू जयपाल उरण, पेणसाठी सुसंता मोहपात्रा, अलिबाग, श्रीवर्धन, महाडसाठी एस. हरीकिशोरे यांची नियुक्ती केली असल्याची माहितीही डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.
समाज माध्यमांवरून होणारा प्रचार, जाहिराती तसेच आक्षेपार्ह मजकूर यांची निवडणूक यंत्रणेमार्फत पडताळणी केली जाणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. याप्रसंगी निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी वैशाली माने, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके उपस्थित होते.