कर्जत : तालुक्यातील कुपोषण कमी करण्याच्या उद्देशाने कम्युनिटी अॅक्शन फॉर न्यूट्रिशन प्रकल्पांतर्गत दिशा केंद्राच्या वतीने कामगार दिनाचे औचित्य साधून टेंभरे कातकरवाडीमध्ये आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी, उपचार व मार्गदर्शन शिबिरात आठ मुले कुपोषित आढळून आली. त्यापैकी चार तीव्र कुपोषित श्रेणीतील मुलांना पोषण - पुनर्वसन केंद्र एनआरसीमध्ये दाखल करून उपचार केले जाणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने आॅक्टोबर २०१८ पासून सुरू केलेल्या ‘कम्युनिटी अॅक्शन फॉर न्यूट्रिशन प्रकल्पाची तालुकास्तरीय अंमलबजावणी संस्था असलेल्या दिशा केंद्राच्या वतीने ३० एप्रिल रोजी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी उपचार व मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेणचे निरीक्षक भानुशाली यांनी केले. या वेळी टेंभरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हरेश घुडे, तटांमुक्ती समितीचे अध्यक्ष सुरेश सोनावळे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमाचे डॉ. जयश्री म्हात्रे, डॉ. पूजा महाले, डॉ. गणेश घुले, भरारी पथकाचे डॉ. सागर काटे यांच्या टीमने टेंभरे कातकरवाडी, रसपे कातकरवाडी, पाचखडकवाडी येथील उपस्थित मुलांची तपासणी व उपचार केले. टेंभरे ग्रामपंचायतीच्या टेपाची कातकरवाडी येथील समाजमंदिरात घेतलेल्या या शिबिरात ६० मुलांची तपासणी केली. त्या तपासणीत आठ मुले कुपोषित श्रेणीत आढळून आली. त्यापैकी तीव्र कुपोषित श्रेणीतील चार मुलांना अलिबाग येथील पोषण पुनर्वसन केंद्र - एनआरसीमध्ये दाखल करून उपचार केले जाणार आहेत. शिबिर यशस्वी करण्यासाठी अशोक जंगले, रवि भोई, कैलास पवार, विमल देशमुख, रेणुका म्हसे, चंद्रकात गोरे, अंगणवाडी सेविका मंगल निलधे, आशा वर्कर मीरा देशमुख यांनी प्रयत्न केले.