उरण : जुने फूल मार्केट पाडून त्या जागी नवीन इमारत उभारण्यासाठी सुमारे ८० फूलविक्रेत्यांना हलविलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये कोणत्याही सुविधा पुरविल्या नसल्याने फूलविक्रेते संतप्त झाले आहेत. आधी सुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा पुन्हा जुन्या जागी बसण्याचा इशाराही त्यांनी उरण नगर परिषदेला दिला आहे.
उरण नगर परिषदेने जुने फूल मार्केट पाडून त्या जागी नवीन मार्केट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. चार कोटी खर्चाच्या या कामाला सुरुवात करण्यासाठी जुनी फूल मार्केटची इमारत पाडण्यात आली आहे. या जुन्या इमारत आणि बाजारपेठेतील रस्त्यांवर जागा मिळेल तिथे दुकान विक्री करणाऱ्या ८० फूलविक्रेत्यांसाठी १५ दिवसांपूर्वी उनपने पत्र्याच्या शेडमध्ये बसण्याची व्यवस्था केली आहे. मात्र पत्र्याच्या शेडमध्ये पाण्याची, शौचालयाची व्यवस्था केलेली नाही. फूलविक्रेत्यांमध्ये महिलांचाच सर्वाधिक समावेश आहे. मागील १५ दिवसात फूल मार्केटकडे गिऱ्हाईक फारसे फिरकत नाहीत. त्यामुळे धंदा होत नाही. मुंबई मार्केटमधून पहाटे घेऊन आणलेला फुलांचा माल तसाच पडून राहात आहे. मागील १५ दिवसात तर अनेक फूल विक्रेत्यांची बोहणीही झालेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याची माहिती अनिता म्हात्रे या फूलविक्रेत्या महिलेने दिली. यातून मार्ग काढण्यासाठी मागील दहा दिवसांपासून पाचवेळा नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांची भेटी घेतल्या आहेत. मात्र त्यांनी उद्धट उत्तरे देऊन हुसकावून लावण्याचे शुभांगी दळवी या महिला फूलविक्रेत्यांनी सांगितले.
बुधवारी जुन्या जागेवर पुन्हा व्यवसाय करण्यासाठी गेलेल्या फूलविक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या उनप कर्मचाऱ्यांना सेनेचे गटनेते गणेश शिंदे यांनी पिटाळून लावले. त्यानंतर त्यांना आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत तातडीने बैठक बोलावण्याचे आश्वासन मुख्याधिकारी संतोष माळी दिले असल्याची माहिती गणेश शिंदे यांनी दिली.
जुन्या जागेवर फूल मार्केटची इमारत तयार होईपर्यंत नवीन जागेत व्यवसाय करण्यासाठी फूलविक्रेत्यांनी समंती दर्शविल्यानंतरच त्यांना पत्र्याच्या शेडमध्ये हलविण्यात आले आहे. याआधीही जुन्या जागेवर पत्र्याचीच शेड होती. नवीन जागेत पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच फक्त एक मिनिटाच्या अंतरावर असलेल्या विमला तलावातील जीममध्ये शौचालयाची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. उन्हामुळे पत्रे तापून फुले खराब होऊ नयेत यासाठी पत्र्याच्या शेडवर, कापड, ताडपत्री टाकून समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावरून मात्र विरोधकांकडून जाणूनबुजून राजकारण केले जात आहे. सायली म्हात्रे, नगराध्यक्ष, उरण नगर परिषद.