- निखिल म्हात्रेअलिबाग : समाजामध्ये एकोपा आणि सलोख्याचे संबंध वृद्धिंगत व्हावे, यासाठी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना आता जिल्ह्यामध्ये जोर धरताना दिसून येते. या वर्षी जिल्ह्यातील २० गावांमध्ये, ‘एक गाव एक गणपती’ उत्सव धूमधडाक्यात साजरा केला आहे. गावातील नागरिकांमध्ये एकोपा निर्माण झाला असून, सर्व गुण्यागोविंदाने गणेसोत्सव साजरा करू लागले आहेत.एखादी नवीन स्टाइल अथवा नवा ट्रेंड हा शहराकडून ग्रामीण भागाकडे जातो. ग्रामीण भागातील नागरिक विशेष करून तरुणाई तो ट्रेंड तातडीने आत्मसात करतात, परंतु अशा काही तुरळकच प्रथा, गोष्टी आहेत, त्या ग्रामीण भागाकडून शहराकडे जातात. समाजामध्ये एकोपा निर्माण करणारी आणि आर्थिक उधळपट्टीला चाप लावणारी ‘एक गाव एक गणपती’ ही ग्रामीण भागातील प्रथा शहरवासीय कधी आत्मसात करणार हाही प्रश्नच आहे. मात्र, ग्रामीण भागात आता ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना आत्मसात करून, एक गणपतीच्या उत्सवात वाढ होताना दिसत आहे.शहरी आणि ग्रामीण विभागातील भक्तांना दहा दिवस निखळ आनंद देणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जायचे. मात्र, बदलत्या काळात गणेशोत्सवाचा ‘इव्हेंट’ झाल्यापासून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण आले आहे. विविध मंडळे ही स्थानिक राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधलेली असल्याने, त्यामध्ये भक्तीचे प्रमाण कमी झाल्याचे बोलले जाते. गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस दलावर मोठा ताण असतो. त्यातच सार्वजनिक गणपतींची वाढती संख्या ही पोलिसांच्या कामात भर पाडणारीच आहे.नागरिकांनी जबाबदारीने वागावे२० गावांमध्ये केवळ एका गणरायाची स्थापना झाला असून, येथे सर्व गावकरी मिळून विविध उपक्रम राबवित आहेत. भाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सवाचा जल्लोष. गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस दलावर मोठा ताण असतो. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वागून पोलिसांना सहकार्य करावे, असे अवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनीकेले आहे.
वीस गावांमध्ये ‘एक गाव गणपती’ रायगड जिल्ह्यात उत्सव धूमधडाक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 1:15 AM