एकदरा ग्रामपंचायतीला ठोकले टाळे
By admin | Published: December 28, 2016 03:53 AM2016-12-28T03:53:00+5:302016-12-28T03:53:00+5:30
ग्रामपंचायत कार्यालयातून तेथील रहिवाशांना जन्म दाखले, रहिवासी दाखले व विविध सेवा-सुविधा पुरविल्या जातात. परंतु विकासकामेच होत नसल्याने ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर
नांदगाव/ मुरुड : ग्रामपंचायत कार्यालयातून तेथील रहिवाशांना जन्म दाखले, रहिवासी दाखले व विविध सेवा-सुविधा पुरविल्या जातात. परंतु विकासकामेच होत नसल्याने ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर विश्वास उडाला आहे. यामुळे मुरुड तालुक्यातील एकदरा ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी टाळे ठोकले आहेत. एकदरा ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी सरपंच नाही त्यामुळे पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी एस.एच. वाणी यांच्याकडे सरपंचपदाचा कार्यभार आहे. अनुसूचित जमातीसाठी हे पद राखीव असल्याने येथे जातपडताळणी दाखला नसल्याने या पदाचा कार्यभार वाणी यांच्याकडे आहे.
१३ तसेच १४ व्या वित्त आयोगाचे पैसे ग्रामपंचायतीला मिळाले आहेत. वर्तमानपत्रात निविदा प्रसिद्ध झाली, परंतु कामाचा पत्ता नाही. या योजनेतून गावासाठी अनेक विकासाची कामे होणार होती. परंतु सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन सुद्धा कोणतेही काम सुरु झाले नाही. पैसे असून सुद्धा विकासकामे करण्यात ग्रामसेवक व सरपंच टाळाटाळ करीत आहेत. गावातील पाणी योजनेची पाइपलाइन फार जुनी असून ती बदलणे खूप आवश्यक असताना सुद्धा या दुरु स्तीकडे या दोन अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. या ग्रामपंचायतीवर प्रशासक असून हे क्वचितच ग्रामपंचायतीला भेट देतात. मग गावाच्या विकासाकडे लक्ष कोण देणार असा प्रतिप्रश्न येथील गावकऱ्यांनी विचारला आहे. याबाबतचे रीतसर निवेदन गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात येऊन सुद्धा विकासकामाबाबत कोणतेच ठोस आश्वासन न दिल्याने अखेर जगन्नाथ वाघरे व असंख्य ग्रामस्थांनी मिळून या ग्रामपंचायतीला टाळे ठोकले आहे.
याबाबत ग्रामसेवक राजेंद्र दवटे यांना विचारणा केली असता लवकरच विकासकामांची सुरु वात करणार असून हा वाद सामोपचाराने मिटवणार आहोत. गावात दोन विभाग असल्याने विकासकामांवर लवकर एकमत होत नसले तरी सुद्धा लवकरच विकासकामांना सुरु वात करू, असे ते यावेळी म्हणाले. ग्रामपंचायतीला कुलूप लावल्याने तालुक्यात सर्वत्र हा चर्चेचा विषय ठरला आहे. (वार्ताहर)