आविष्कार देसाई अलिबाग : रायगड लोकसभा निवडणुकीतील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. या कालावधीत आघाडी आणि युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बड्या-बड्या स्टार प्रचारकांच्या सभा पार पडल्या आहेत, तर काही ठिकाणी अद्यापही सभा होणार आहेत. आतापर्यंत विविध सभांवर तटकरे आणि गीते यांच्याकडून प्रत्येकी तीस लाख रुपयांचा खर्च केल्याचे बोलले जाते; परंतु खर्चाचे शॅडो रजिस्टर आणि उमेदवारांनी केलेल्या दैनंदिन खर्चाचा ताळमेळच लागत नसल्याने प्रशासनासह उमेदवारांचीही चांगलीच तारांबळ उडल्याचे दिसून येते. १५ एप्रिलपर्यंत झालेला खर्चाचा हिशेब १६ एप्रिल रोजी झालेल्या ताळमेळ बैठकीत देण्यात आलेला आहे. मात्र, त्यानंतरच्या हिशेबाचे गणित जुळत नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली होती. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने निवडणूक विभागाने कडक निर्बंध लागू केले. त्यामुळे उमेदवाराच्या वारेमाप खर्चावरही नियंत्रण आले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ७० लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे. ७० लाख रुपयांच्यावर उमेदवारांना एक नवा पैसाही खर्च करता येणार नाही. रायगड लोकसभा मतदार संघामध्ये तब्बल १६ उमेदवार आपले राजकीय नशीब आजमावत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते या दोन उमेदवारांमध्येच खरी लढत असल्याने दोन्ही उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. याच उमेदवारांभोवती निवडणूक फिरत असल्याने स्वाभाविकपणे सर्वांच्याच नजरा याच दोन उमेदवारांकडे लागल्या आहेत.या आधी २०१४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत गीते यांनी तटकरे यांचा अतिशय निसटता पराभव केला होता. हेच दोन्ही नेते आता पुन्हा शड्डू ठोकून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. गीते यांनी केलेला पराभव तटकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे त्यांना ही निवडणूक काही करून जिंकायचीच असल्याने त्यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे, तर दुसरीकडे गीते हे हॅट्ट्रिक करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांनीही चांगलाच जोर लावला आहे.आघाडीला आणि युतीला आपापल्या उमेदवारांना निवडून आणायचेच असल्याने मतदारसंंघामध्ये विविध ठिकाणी प्रचार सभांचे आयोजन केले आहे. त्यातील बहुतांश सभा या पार पडल्या आहेत.स्टार प्रचारकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, धनंजय मुंडे, डॉ.अमोल कोल्हे, जयंत पाटील, नवाब मलिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश आहे. यांच्या जंगी सभांना हजारोंच्या संख्येन गर्दी होत असल्याचे दिसून येते. भव्यदिव्य स्टेज, लाइट, खुर्च्या, ध्वनिक्षेपक, वाहने, झेंडे, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था, नाष्टाची व्यवस्था, पत्रक, बॅनर यासह अन्य बाबींवर खर्च होत आहे. निवडणूक विभागाने आखून दिलेली ७० लाखांची मर्यादा ओलांडली जाते का यासाठी प्रत्येक उमेदवाराच्या कार्यक्रमावर नजर ठेवण्यासाठी पथक तैनात केली आहेत. सभेच्या ठिकाणी उभारलेले स्टेज, खुर्च्या, पाणी, सभेला झालेली गर्दी अशा सर्वांचे चित्रीकरण केले जात आहे.उमेदवाराला आपल्या खर्चाचा हिशेब डे टू डे अपडेट ठेवावा लागत आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सादर केलेला खर्च आणि प्रशासनाकडे असलेले शॅडो रजिस्टर यांचा ताळमेळ बसणे गरजेचे आहे. तटकरे आणि गीते यांनी आतापर्यंत प्रत्येकी ३० लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागातील मीडिया सेंटरने ‘लोकमत’ला दिली. परंतु उमेदवारांच्या खर्चाचा ताळमेळ लागत नसल्याने निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर त्याची माहिती अपलोड करण्यात आली नसल्याची माहितीही त्यांनी दिली.>गुहागर, दापोली मतदारसंघातीलखर्च वेळेवर मिळण्यास अडचणीउमेदवार सतत प्रचारामध्ये व्यस्त असतात. त्यांनी खर्चासाठी टीम नेमलेली असते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे खर्चाच्या पावत्या सादर करण्यास विलंब होतो. त्याचप्रमाणे रायगड लोकसभा मतदार संघाचा काही भाग रत्नागिरी जिल्ह्याला जोडला आहे. तेथील गुहागर आणि दापोली मतदार संघात झालेला खर्चही वेळेवर मिळण्यास अडचणी येत असाव्यात. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ लागण्यास उशीर होतो. त्या सर्व पावत्या सादर केल्यावर हिशेबाची गणिते जुळतात, असे एका राजकीय नेत्याने सांगितले.
मतांचे गणित जुळवताना निवडणूक खर्चाचा लागत नाही हिशेब
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 12:38 AM