महाडमधील मतदार संघावर निवडणूक निरीक्षकाची नजर
By admin | Published: February 16, 2017 02:13 AM2017-02-16T02:13:42+5:302017-02-16T02:13:42+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या २०१७ मधील २१ फेबु्रवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी महाड पोलादपूर तालुक्यासाठी
दासगाव : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या २०१७ मधील २१ फेबु्रवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी महाड पोलादपूर तालुक्यासाठी निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आचारसंहिता पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, भरारी पथक, व्हीडीओ पाहणी पथक अशा चार पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या सर्व पथकांना बुधवारपासून आपआपल्या कामगिरीवर रुजू करण्यात आले आहे. स्थिर पथकाकडून महाडमध्ये येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत असल्यामुळे एकच खळबळ माजली होती. या पथकांमुळे आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले
आहेत.
महाड आणि पोलादपूर तालुक्यात निवडणूक शांततेत पार पडणे, तसेच आचारसंहितेचा भंग होवू नये यासाठी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी निरीक्षकपदी निवड करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहिता पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, भरारी पथक, व्हीडीओ पाहणी पथक अशी चार पथके तयार करण्यात आली आहेत. या चारही पथकांना बुधवारपासून तालुक्यातील सर्व मतदार संघावर नजर ठेवण्यासाठी कामगिरीवर लावण्यात आले. महाड तालुका मतदार संघावर करडी नजर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
आचारसंहिता पथकाचे प्रमुख महाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे मुख्य आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १ पोलीस उपनिरीक्षक तसेच १ व्हिडीओ कॅमेरा आहे. तालुक्यातून कोणतीही तक्रार आल्यास त्या ठिकाणी जावून पाहणी करत योग्य ती कारवाई करण्याचे अधिकारी देण्यात आले आहेत.
दुसरे स्थिर सर्वेक्षण पथक या पथकामध्ये महाड पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी, ग्रामसेवक तसेच पोलिसांचा समावेश आहे. हे पथक महाड शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्ता केंबुर्ली गावचे हद्दीत तसेच वरंध टॅपजवळ असे दोन ठिकाणी हे पथक तैनात करण्यात आलेले आहेत. या पथकांनी या ठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्या संशयित वाहनांची कसून तपासणी के ली.
तिसरे भरारी पथक या पथकामध्ये चार मंडल अधिकारी तसेच तलाठ्यांचा समावेश आहे. या पथकांनी निवडणूक होईपर्यंत तालुक्यातील सर्व भागात मतदार संघात रस्त्यावर गस्त घालत संशयित ठिकाणी, तसेच संशय येणाऱ्या वाहनांची तपासणी करावयाची आहे. तर चौथे पथक व्हीडीओ पाहणी पथक या पथकामध्ये देखील पंचायत समितीमधील कक्ष अधिकारी यांचा समावेश असून या पथकांनी निवडणूक काळात मतदान होईपर्यंत सर्व पक्षांच्या होणाऱ्या रॅली, सभा यांची शूटिंग करून त्या सीडीची पाहणी करत या रॅली तसेच सभेमध्ये होणाऱ्या खर्चाचा अहवाल निरीक्षकांकडे सादर करणे, तसेच आचारसंहितेचा भंग करणाऱ्यावर लक्ष ठेवणे हे काम आहे. बुधवारपासून ही सर्व पथके संपूर्ण तालुक्यात कामाला लागली असून महाड शहराला जोडणारा मुख्य रस्ता या ठिकाणी स्थिर पथकाने बुधवारी सकाळपासूनच आपला मोहिमेला जोराने सुरुवात करत शहरामधून बाहेर पडणाऱ्या तसेच शहरामध्ये येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुरू केली होती. या पथकामुळे निवडणूक काळात होणारा पैशाचा गैरवापर, तसेच आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसणार असल्याचे मतदारांकडून बोलले जात आहे. (वार्ताहर)