यंदाची निवडणूक सत्तेची नव्हे, विचारांची! - सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 12:16 AM2019-03-30T00:16:51+5:302019-03-30T00:18:33+5:30

देशातील भाजपा सरकारने सर्वांचाच भ्रमनिरास केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच धोक्यात आले असल्याने आम्ही सारे एकत्र आलो आहोत.

This election is not the power of the vote! - Sunil Tatkare | यंदाची निवडणूक सत्तेची नव्हे, विचारांची! - सुनील तटकरे

यंदाची निवडणूक सत्तेची नव्हे, विचारांची! - सुनील तटकरे

Next

अलिबाग : देशातील भाजपा सरकारने सर्वांचाच भ्रमनिरास केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच धोक्यात आले असल्याने आम्ही सारे एकत्र आलो आहोत. यंदाची निवडणूक विचारांची आहे, सत्तेची नाही, अशी भूमिका रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शेकाप आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी येथे बोलताना स्पष्ट केली.
रायगड लोकसभा मतदारसंघामधून आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील मैदानात जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन भाजपा सरकारने देशातील जनतेचा भ्रमनिरास केल्याचे नमूद करून रायगडच्या विद्यमान खासदारांनी गेल्या पाच वर्षांत काय कामे केली हे त्यांनी मतदारांना सांगावे असे जाहीर आव्हान तटकरे यांनी गीते यांना दिले. खासदार कसा नसावा असे सांगण्याची वेळ आली असल्याचे तटकरे म्हणाले.
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी करणार असल्याचे गीते यांनी गुरुवारच्या सभेत बोलताना म्हटले होते, त्याचा समाचार घेताना शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी गीते यांनी खुशाल
चौकशी करावी असे आव्हान दिले. त्या चौकशीसाठी तुम्हीच अध्यक्ष व्हा आणि बँकेत काही गडबड
आढळली तर, सांगाल ते करायला तयार असल्याचेही स्पष्ट केले. आघाडीचे उमेदवार तटकरे यांना रायगड लोकसभा मतदार संघातून मताधिक्य दिले नाही तर, मला राजकारणातून निवृत्ती घ्यावी लागेल असा उपरोधिक टोलाही त्यांनी गीते यांना लगावला.
रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिक जगताप यांनी काँग्रेस सरकारच्या काळातच कोकणात आरसीएफ, रिलायन्स, इस्पातसारखे मोठे प्रकल्प आले आणि हजारो रोजगार उपलब्ध झाले. रत्नागिरीचे चार वेळा आणि रायगडचे दोन वेळा खासदार बनलेल्या आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री पदावर असताना कोकणात एकही कारखाना आणला नाही.
आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून कामास सुरुवात केली आणि जनसामान्याच्या हिताची कामे करून पदाला न्याय दिला असे जगताप यांनी सांगितले.
सभेच्या वेळी माजी मंत्री शेकापच्या नेत्या मीनाक्षी पाटील, दापोली-खेडचे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम, शेकाप आमदार बाळाराम पाटील, अलिबागचे आमदार पंडित पाटील, पेणचे आमदार धैर्यशील पाटील, शेखर निकम, आ.अनिकेत तटकरे, रायगड जि.प.अध्यक्षा अदिती तटकरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

५० हजार मतांचे मताधिक्य देणार- भास्कर जाधव
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आ.भास्कर जाधव यांनी दापोली आणि गुहागर या दोन्ही विधानसभा मतदार संघात तटकरे यांना ५० हजार मतांचे मताधिक्य देणार असल्याचे जाहीर केले. गेल्या तीस वर्षांत ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले त्या रत्नागिरी आणि रायगड या दोन्ही मतदार संघात गीते स्वत:चे मत स्वत:ला देऊन बोटाला शाई लावून घेऊ शकले नाहीत असे आ.जाधव यांनी सांगितले. काँग्रेसच्या बॅ.अंतुले भवन येथे आघाडीचे उमेदवार तटकरे यांच्या समर्थनार्थ सकाळी सभा झाली. त्याप्रसंगी सुनील तटकरे,पत्नी वरदा तटकरे आदी उपस्थित होते.

शेकाप-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी आजची नाही तर रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून आहे. आघाडीमधील घटक पक्षातील काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी तटकरे यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे असे आमदार जयंत पाटील यांनी वक्तव्य केले.

Web Title: This election is not the power of the vote! - Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.