अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त सामान्य निवडणूक निरीक्षक रवींद्र सिंह हे बुधवारी अलिबाग येथे दाखल झाले असून त्यांनी निवडणूक यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसमवेत प्राथमिक बैठकीत तयारीचा आढावा घेतला. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सादरीकरण केले. पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी देखील कायदा व सुव्यवस्थेविषयी माहिती दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततामय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात येणाºया सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना रवींद्र सिंह यांनी या वेळी दिल्या. रवींद्र सिंह यावेळी म्हणाले की, निवडणूक प्रक्रि या निर्भय व मुक्तपणे व कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची खात्री करून घ्यावी. दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर व्हीलचेअर आणि मदतनीस उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मतदारांची संख्या लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही केल्या.
आचारसंहिता अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी सर्व संबंधित पथकांनी काळजीपूर्वक काम करावे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे संनियंत्रण करण्यासाठी नियुक्त पथकांनी उमेदवाराच्या प्रत्येक खर्चाची नोंद घेण्याच्या सूचना रवींद्र सिंह यांनी केल्या. निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन केलेली भरारी पथके, स्थायी निरीक्षण पथके, तपास नाके, मतदान केंद्रांवरील उपलब्ध सुविधा, कायदा व सुव्यवस्था, स्वीप कार्यक्र म आदी बाबींचा त्यांनी आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी आभार मानले.निवडणूक निरीक्षक रवींद्र सिंह हे अलिबाग येथील तुषार या शासकीय विश्रामगृहात दररोज (शासकीय सुट्या वगळून) सकाळी ११ ते १२ या वेळात लोकांना भेटण्यासाठी उपलब्ध असतील.