रायगडमधील ९० ग्रा.पं.चा निवडणूक कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:07 AM2019-01-24T01:07:02+5:302019-01-24T01:07:04+5:30
मार्च २०१९ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे २६४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.
पेण : मार्च २०१९ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे २६४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. २४ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान या ग्रामपंचायतीसाठी होणार असून बुधवारी २३ जानेवारीपासून संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
राज्यभरातील सहा प्रशासकीय विभागातील कोकण, नाशिक, पुणे औरंगाबाद, अमरावती व नागपूर या विभागातील ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. सर्वाधिक कोकण विभागातील १३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी थेट सरपंच निवडद्वारे होणारी ही निवडणूक येणाºया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक ठरणाºया आहेत. पेणमधील पाच मोठ्या ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असल्याने राजकीय रणांगण तापणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमात २५ जानेवारीला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, निवडणूक उमेदवारी अर्ज मागविण्याचा व सादर करण्याची तारीख ४ ते ९ फेब्रुवारी २०१९ या दिवसात सकाळी १० ते दु. ३ वाजेपर्यंत आहे. उमेदवारी अर्जाची छाननी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजलेपासून छाननी संपेपर्यंत, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख १३ फेब्रुवारी रोजी दु. ३ वाजेपर्यंत आहे. याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप दु. ३ वाजल्यानंतर होईल. मतदान २४ फेब्रुवारी रोजी रविवार सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यंत होणार आहे. निवडणुकीचा निकाल २५ फेब्रुवारी रोजी संबंधित ग्रामपंचायतीच्या तालुक्याच्या ठिकाणी जाहीर होईल.
पेणमधील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका
निवडणूक होणाºया राज्याच्या प्रशासकीय सहा विभागातील कोकणातील सर्वाधिक १३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. सर्वाधिक रायगडमधील ९० ग्रामपंचायत, रत्नागिरी ४० तर सिंधुदुर्ग १ अशाप्रकारे सहभाग आहे. पेण तालुक्यातील मोठ्या संख्येने मतदार असलेल्या वढाव, उंबर्डे, शिर्की, कांदळे व शिहू या पाच ग्रामपंचायतीमध्ये २४ फेब्रुवारी रोजी मतदान होत असल्याने पेण अंतोरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपाठोपाठ या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे.
जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी थेट सरपंच निवडद्वारे होणारी ही निवडणूक येणाºया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक आहे.