संतोष सापते
श्रीवर्धन : आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघात विकास, प्रखर राष्ट्रवाद, जातीय समीकरणे, मित्रपक्षातील अंतर्गत वाद, हेवेदावे व पक्षांतराचे वारे या सर्व बाबी लक्षात घेता चुरस निर्माण झाली आहे. विद्यमान आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार अदिती तटकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यमान खासदार सुनील तटकरे व आमदार अवधूत तटकरे यांच्या सत्तासंघर्षामुळे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील लढत दोघांसाठी प्रतिष्ठेची ठरण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
शिवसेनेकडून अनिल नवगणे, रवि मुंडे, समीर शेडगे या नावाची चर्चा सुरू आहे. गेल्या विधानसभेपासून भाजप निवासी झालेले कृष्णा कोबनाक भाजपकडून आमदारकीसाठी इच्छुक आहेत. काँग्रेस पक्षातील युवावर्गाने बंडखोरीचा झेंडा फडकवत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडावा, असा सूर आळवला आहे. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात आमदार कोण? या चर्चेला सध्या उधाण आले आहे.श्रीवर्धन हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता; परंतु सुनील तटकरे यांनी २००९ मध्ये श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवत सर्व समीकरणे बदलली. विकासाला प्राधान्य देत त्यांनी मतदारसंघातील विविध मूलभूत प्रश्न मार्गी लावले. त्यामुळे शिवसेनेतील अनेक स्थानिक नेते व पदाधिकारी राष्ट्रवादीच्या गोटात सामीलझाले.२०१४ ला अवधूत तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. मात्र, राज्यात युतीचे सरकार आल्यापासून स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्षांतर सुरू केले.लोकसभा निवडणुकीच्या वेळी देशात मोदीलाट असताना सुनील तटकरे रायगडचे खासदार झाले. त्यांच्या विजयात श्रीवर्धन व अलिबाग मतदारसंघाने निर्णायक भूमिका बजावली आहे. त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघात सुनील तटकरे यांचे वर्चस्व प्रस्थापित झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येते. सध्या शिवसेना, भाजप दोन्ही पक्षांत एकवाक्यतेचा अभाव आहे. दोन्ही पक्षांतील अंतर्गत कलह त्याच्या विजयातील मोठा अडसर ठरू शकतात.शिवसेना पक्षाची रचना व ग्रामीण भागातील लोकांशी असलेली नाळ सेनेचे खरे बळ मानले जाते; परंतु श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेनेकडे एकही प्रभावी व समर्पक नेता नसल्याचे दिसून येते, त्याचा परिणाम निवडणूक निकालावर होतो. राष्ट्रवादीने पर्यटन विकास हा मुद्दा अग्रणी धरल्याने स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे. श्रीवर्धन नगरपरिषद, म्हसळा नगरपरिषद दोन्ही राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. श्रीवर्धन, म्हसळा, तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. मतदारसंघात कुणबी व्होट बँक निर्णायक ठरत असल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. अनिल नवगणे व कृष्णा कोबनाक दोन्ही कुणबी चेहरे आहेत. अनिल नवगणे यांचा श्रीवर्धन मतदारसंघात वावर विरळ आहे.
कृष्णा कोबनाक मतदारसंघात विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. आजमितीस श्रीवर्धन मतदारसंघातील भाजपची ताकद जेमतेम वाढलेली दिसून येते. त्याचा परिणाम कोबनाक यांच्या आमदारपदाच्या दावेदारीवर होऊ शकतो.अदिती तटकरे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. वडिलांचा वैचारिक वारसदार म्हणून जनता त्यांच्याकडे पाहते. त्या सध्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असल्याने श्रीवर्धन मतदारसंघातीलजनतेशी विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनतेशी जवळीक साधत आहेत.श्रीवर्धन मतदारसंघातील मुस्लीम व्होट बँक, वंचित आघाडी हे किंगमेकर ठरू शकतात. मात्र, वंचितची पाळेमुळे अद्याप मतदारसंघात रुजली नाहीत. मतदारसंघातील बहुसंख्य मुस्लीम मतदार राष्ट्रवादीमयझाला आहे. मुस्लीम समाजातील अनेक युवक आजही बॅरिस्टर रेहमान अंतुले यांना मानत असल्याने काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत.च्श्रीवर्धन मतदारसंघातील ग्रामीण भागात रस्त्याचा प्रश्न, पेयजल, रोजगार, महानगराकडे होणारे स्थलांतर या समस्या गंभीर आहेत. मतदारसंघातील शहरी भागात वाहतूककोंडी, पर्यटनपूरक व्यवसाय, ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ले यांचे संवर्धन या बाबी अद्याप दुर्लक्षित आहेत. वैद्यकीय सेवेसाठीही महानगरांकडे धाव घ्यावी लागते.च्देशपातळीवर प्रखर राष्ट्रवाद निर्माण झाल्याने तरुणवर्ग भाजपकडे आकर्षित होत आहे. शिवसेना व चाकरमानी हे समीकरण जुने आहे. मुबंईस्थित मतदार निवडणुकीत महत्त्वाचा ठरतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास व्हिजन स्थानिकांच्या मनात रुंजी घालत आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निश्चितच संघर्षमय होण्याची शक्यता दिसून येत आहे.