निवडणूक होणार रंगतदार
By admin | Published: December 21, 2015 01:30 AM2015-12-21T01:30:09+5:302015-12-21T01:30:09+5:30
नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी एकूण १७ प्रभागातून ६४ उमेदवारांनी अर्ज दाखले. मात्र छाननीत ११ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने ५३ उमेदवार रिंगणात आहेत
प्रकाश कदम, पोलादपूर
नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी एकूण १७ प्रभागातून ६४ उमेदवारांनी अर्ज दाखले. मात्र छाननीत ११ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने ५३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील प्रभाग क्र. ६ मध्ये शेकापचे उमेदवार राम काशिराम सुतार यांचा अर्ज अवैध ठरल्याने शिवसेनेचे उमेदवार व पोलादपूर ग्रामपंचायतीचे शेवटचे सरपंच उमेश पवार यांचा एकमेव अर्ज प्रभाग क्र. ६ मध्ये राहिल्याने पोलादपूर नगरपंचायतीचा पहिला नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आल्याची औपचारिक घोषणाच बाकी आहे.
पोलादपूर नगरपंचायतीत एकूण १७ प्रभाग असून एकूण मतदार संख्या ४४६८ एवढी आहे. त्यामध्ये पुरुष मतदार २१८७ असून स्त्री मतदार संख्या २२८१ एवढी आहे. एकूण ९ प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत तर प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान महिलेला मिळणार आहे. प्रभाग क्र. ४ हा सर्वात जास्त मतदार म्हणजे ४७७ संख्या असलेला प्रभाग असून प्रभाग क्र. १६ हा सर्वात कमी मतदार म्हणजे १४१ मतदार संख्या आहे. पोलादपूर नगरपंचायतीमध्ये सर्व १७ प्रभागामध्ये निवडणूक लढवणारा पक्ष म्हणून शिवसेना हा एकमेव पक्ष आहे तर एकूण १३ प्रभागामध्ये काँग्रेस पक्षाने उमेदवार देऊन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, भाजपा, शेकाप यांनी काही प्रभागात आपले उमेदवार दिले आहेत. शिवसेनेमध्ये काही इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यामुळे प्र.क्र.४, ५, १७ मधील शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा रस्ता धरला. त्यामुळे काहीशी बॅकफूटवर आलेल्या शिवसेनेला प्र.क्र.६ मधील उमेश पवार यांच्या बिनविरोध निवडीमुळे नवसंजीवनी प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायतीसाठी काँग्रेस - शेकाप या पक्षांची आघाडी झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीमध्ये सामील झाल्यास निवडणूक अजून रंगतदार होऊ शकते. सध्यातरी शिवसेना व काँग्रेस यांच्यामध्ये ही निवडणूक चुरशीची होणार असे दिसून येते.
आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप, माजी आमदार प्रवीण दरेकर या नगरपंचायतीच्या निवडणूक निमित्ताने आमनेसामने आले आहेत. पोलादपूर नगरपंचायतीमध्ये जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पोलादपूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने बाजारहाटासाठी व शासकीय कामाकरिता पोलादपूर तालुक्यातील ८७ गावे २१२ वाड्यातील ग्रामस्थ या शहरावर अवलंबून आहेत. या शहरात महिलांसाठी शौचालये असणे गरजेचे आहे तर बऱ्याच प्रभागांमध्ये अंतर्गत रस्त्यांची समस्या असून सांडपाण्याची व्यवस्था नाही. येथे मनोरंजनासाठी एकही सिनेमागृह नाही तर खेळांसाठी मैदान नाही तसेच ज्येष्ठ नागरिकांना किंवा जनतेला निवांत बसण्यासाठी गार्डन नाही. अशा प्रकारची नागरी सुविधांची आव्हाने निवडून येणाऱ्या नगराध्यक्षांपुढे असणार आहेत.