उरण - राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका ५ नोव्हेंबर रोजी घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.यामध्ये उरण तालुक्यातील जासई,चिरनेर आणि दिघोडे या तीन ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.
जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती सन २०२२ मध्ये निवडणूका झालेल्या नाहीत. त्या ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीव्दारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोट निवडणुकांसाठी निवडणूक होणार आहे. उरण तालुक्यातील जासई, चिरनेर आणि दिघोडे या तीन ग्रामपंचायतींचा समावेश असुन सध्या या तीनही ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासक सांभाळत आहेत.
येत्या ५ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या तीनही ग्रामपंचायतच्या निवडणूकीसाठी आचारसंहिता ६ ऑक्टोबर २०२३ पासून लागू होणार आहे. या ग्रामपंचायतीच्या नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर पर्यंत तारीख देण्यात आली आहे.तर नामनिर्देशन पत्राची छाननी २३ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची तारीख २५ ऑक्टोबर रोजी २ वाजेपर्यंत असणार आहे.तर मतदान हे ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७-३० ते सायंकाळी ५-३० पर्यंत होणार असून मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.