जिल्ह्यात आॅक्टोबरमध्ये निवडणुका,मतदार थेट निवडणार सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 03:12 AM2017-09-04T03:12:00+5:302017-09-04T03:12:15+5:30

निवडणुकीत थेट नगराध्यक्ष निवडून दिल्यानंतर आता थेट सरपंच निवडून देण्याची संधी मतदारांना प्राप्त झाली आहे. रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

 Elections in the district in October, the Sarpanch will be elected directly by the voters | जिल्ह्यात आॅक्टोबरमध्ये निवडणुका,मतदार थेट निवडणार सरपंच

जिल्ह्यात आॅक्टोबरमध्ये निवडणुका,मतदार थेट निवडणार सरपंच

Next

आविष्कार देसाई 
अलिबाग : निवडणुकीत थेट नगराध्यक्ष निवडून दिल्यानंतर आता थेट सरपंच निवडून देण्याची संधी मतदारांना प्राप्त झाली आहे. रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे प्रथमच २४२ सरपंच आता थेट जनतेमधून निवडले जाणार आहेत. १६ आॅक्टोबरला मतमोजणी होणार असल्याने ऐन दिवाळीच्या दोन दिवस आधीच राजकीय धमाका अनुभवायला मिळणार आहे.
रायगड जिल्ह्यातील २५३ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर २०१७ आणि फेब्रुवारी २०१८ या कालावधीत संपत आहे. पैकी २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्र म निवडणूक आयोगाने जाहीर केला. सप्टेंबर आणि आॅक्टोबर या कालावधीत निवडणूक प्रक्रि या पार पडणार आहे.
जिल्ह्यासह तालुक्यामध्ये एकूण ग्रामपंचायतींपैकी ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तेथील संपूर्ण क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू राहणार आहे.
निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या लगतच्या ग्रामपंचायतींमध्ये देखील आचारसंहिता राहणार असल्याचे निवडणूक आयोगाने बजावले आहे.
थेट नगराध्यक्ष निवडीनंतर प्रथमच आता जनतेमधून सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे राजकीय डावपेचांना जिल्ह्यात चांगलाच जोर येणार असल्याचे बोलले जाते. जनतेमधून थेट सरपंच निवडला जाणार असला तरी राजकीय पक्षांना त्यांच्या राजकीय चिन्हाचा वापर करता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
नवरात्रोत्सवाच्या कालावधीत आणि दिवाळीच्या पूर्वसंध्येला निवडणुकीचा कार्यक्रम पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापणार आहे. जिल्ह्यामध्ये शेकापसह राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगलेच वर्चस्व आहे. त्याखालोखाल शिवसेनेने आपली पकड मजबूत केली आहे. काँग्रेसला अद्यापही राजकीय दिशा सापडलेली नसल्याने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत त्यांचे कसब पणाला लागणार असल्याचे बोलले जाते.
भाजपासाठी ही निवडणूक लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणावी लागेल. ग्रामपंचायतींवर आपल्याच पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागतील.
जनतेमधून थेट सरपंच निवडून द्यायचा असल्याने विविध राजकीय पक्षांना आतापासूनच आपल्या व्यूहरचनेत बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे पुढील कालावधीत राजकीय वातावरण तापून राजकीय धुळवड अनुभवायला मिळणार
आहे.

Web Title:  Elections in the district in October, the Sarpanch will be elected directly by the voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.