नेरळ : कर्जत तालुक्यातील वारे येथे असलेल्या वीज उपकेंद्रासाठी टाकलेल्या वीजवाहिन्या जमिनीवर मोकळ्या पडून आहेत. त्यामुळे सुगवे गावाजवळ त्या वीजवाहिन्यांचे स्फोट होत असून सुगवे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान,महावितरण कंपनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीतअसल्याने ग्रामस्थांमध्ये महावितरण कंपनीबाबत संतापाची भावना निर्माण झाली आहे. कर्जत तालुक्यात वारे येथे महावितरण कंपनीचे वीज उपकेंद्र उभारले जात आहे. त्या उपकेंद्राचे काम महावितरण कंपनीच्या ठेकेदाराकडून सुरु आहे. त्या उपकेंद्राला जोडणारी पाच इंच व्यासाची काळ्या रंगाची केबल मुरबाड रस्त्याने नेण्यात आली आहे. या केबलला सुगवे गावाजवळ काही ठिकाणी जॉइंट आहेत. त्यात ही मुख्य वीजवाहिनी असेलेली केबल जमिनीत गाडून न टाकता रस्त्यावर मोकळी टाकण्यात आली आहे. त्या केबलमुळे सुगवे ग्रामस्थ संकटात आले आहेत. कारण गेल्या महिनाभरात त्या केबलचे स्फोट होत असून सतत असे प्रकार दिवसा आणि रात्री सुरु आहेत. मात्र रात्री होणारे स्फोट आणि त्यातून निर्माण होणारा जाळ यामुळे सुगवे ग्रामस्थ भीतीच्या सावटाखालीआहेत.याबाबत सुगवे ग्रामस्थ असलेल्या बोरीवली ग्रामपंचायतच्या सरपंच क्षीरसागर यांनी महावितरण कंपनीचे उपअभियंता आनंद घुले यांना ग्रामपंचायतीच्या वतीने पत्र देऊन त्या केबलचा बंदोबस्त करण्याची सूचना केली होती. मात्र महिना उलटला तरी महावितरण कंपनी काहीही करू शकली नाही. दुसरीकडे ती केबल मुरबाड - कर्जत रस्त्याच्या कडेला पडलेली असून त्या ठिकाणी नाशिक वरून जेएनपीटीकडे ट्रक हे विसावा घेण्यासाठी थांबत असतात. त्यात एखादा ट्रक केमिकल किंवा ज्वलनशील पदार्थ वाहून नेणारा असल्यास, त्यावेळी केबलचे स्फोट झाल्यास पूर्ण सुगवे गाव जळून भस्मसात होऊ शकते.आम्ही केबल टाकताना ती जमिनीमध्ये टाकण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले,त्याचवेळी तुकडे असलेली केबल त्या ठिकाणी लावल्याने स्फोट होण्याचे प्रमाण अधिक आहेत. हे प्रमाण असेच सुरु राहिल्यास मोठा अपघात होऊ शकतो.- भूषण पेमारे, सामाजिक कार्यकर्ते, सुगवे>आपण वारे येथील उपकेंद्राचे काम करणाऱ्या ठेकेदाराला केबल जमिनीत गाडून टाकण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचवेळी त्या ठिकाणी तुकडे जोडले असतील तर तेथे अखंड केबल टाकण्याच्या सूचना केल्या आहेत.- आनंद घुले, उप अभियंता महावितरण, कर्जत
सुगवे गावाजवळ वीजवाहिन्यांचे स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:08 AM