बिल न भरल्याने दोन शाळांचा वीजपुरवठा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 11:31 PM2020-02-04T23:31:10+5:302020-02-04T23:31:40+5:30

महाजने, महाजने दिवी-वाडी प्राथमिक शाळेतील ५१ विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय

Electricity of two schools disrupted due to non-payment of bills | बिल न भरल्याने दोन शाळांचा वीजपुरवठा खंडित

बिल न भरल्याने दोन शाळांचा वीजपुरवठा खंडित

Next

- आविष्कार देसाई 

अलिबाग : वीजबिल थकल्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असणाऱ्या महाजने आणि महाजने दिवी-वाडी या प्राथामिक शाळेतील वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, या शाळा डिजिटल शाळा आहेत. लाइट नसल्याने तब्बल ५१ विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायतींच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांवर ही वेळ आल्याचे बोलले जाते.

सर्वांना शिक्षणाचा अधिकार, या धोरणानुसार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी सरकारने निर्माण केल्या आहेत. त्यामुळे कोणतेच मूल शिक्षणाअभावी राहणार नाही, याची काळजी सरकारने घेतली आहे. मात्र, प्रशासकीय पातळवरील अकार्यक्षमतेमुळे शिक्षणाच्या धोरणाला ब्रेक लावण्यात येत असल्याचे दिसून येते.

अलिबाग तालुक्यातील बेलोशी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये महाजने आणि महाजने दिवी-वाडी या दोन शाळा आहेत. पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. त्यातील महाजने दिवीमधील शाळेत २१ आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात, तर महाजने या शाळेत तब्बल ३० विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. काही शाळामध्ये इंग्रजी विषयही शिकवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाचे सहज आणि सोप्या पद्धतीने आकलन व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा या डिजिटल झाल्या
आहेत.

महाजने आणि महाजने दिवी-वाडी या शाळांनाही माजी विद्यार्थ्यांनी दोन वर्षांपूर्वी संगणक आणि प्रोजेक्टर भेट दिला आहे; परंतु विजेचे बिल न भरल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून महावितरण विभागाने शाळेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. दोन्ही शाळांचे मिळून सुमारे दहा हजार रुपये चार महिन्यांपासून थकीत आहेत.

शाळेतील विजेचे बिल थकण्यामध्ये शिक्षण विभाग तसेच ग्रामपंचायत विभाग कारणीभूत आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे ग्रामस्थ अ‍ॅड. राकेश पाटील यांनी सांगितले. याबाबत शिक्षणाधिकारी नितीन मंडलिक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

थकीत वीजबिल भरण्याची ग्रामस्थांकडून मागणी

शाळेचे थकलेले वीजबिल तातडीने भरण्यात यावे आणि विद्यार्थ्यांना विनाखंड शिक्षण देण्याची तातडीने व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थ जितेंद्र गुंड यांनी, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे आणि उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शीतल पुंड यांना दिले.या प्रकरणी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश पद्मश्री बैनाडे यांनी दिले. त्यानंतर शीतल पुंड यांनी संबंधितांना विजेचे बिल १४ व्या वित्त आयोगातून भरण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश दिले.

ग्रा.पं.कडे निधी नाही

ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगातून थकीत वीजबिल भरण्याची व्यवस्था करावी, असे पत्रक रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी या आधीच काढले आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडे निधी नसल्याचे कारण ग्रामसेवक देत असल्याचे महाजने दिवी-वाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विनायक भोनकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

गेल्या आठ दिवसांपासून लाइट नसल्याने डिजिटल शिक्षणासह नियमित शिक्षण देताना अडचण येत आहे. दोन दिवसांमध्ये वीजबिल भरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
- सुनीता वारे, मुख्याध्यापिका, महाजने प्राथमिक शाळा

Web Title: Electricity of two schools disrupted due to non-payment of bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.