दुर्गम तुंगी गावात लवकरच पोहोचणार वीज
By admin | Published: December 22, 2016 06:18 AM2016-12-22T06:18:06+5:302016-12-22T06:18:06+5:30
तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या खांडस ग्रामपंचायतीमधील तुंगी गावात काही दिवसांनी वीज पोहचणार आहे. खासदार श्रीरंग बारणे
विजय मांडे / कर्जत
तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या खांडस ग्रामपंचायतीमधील तुंगी गावात काही दिवसांनी वीज पोहचणार आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्लीमध्ये वन विभागाकडे केलेला पाठपुरावा आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत तुंगी गावाला वीज पोहोचावी म्हणून आमदार सुरेश लाड आणि जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. तीन किलोमीटर लांबीवरून तुंगी गावात सौदामिनी पोहोचावी या प्रस्तावास महावितरण कंपनीने अंतिम मंजुरी दिली आहे. तुंगी गावातील लोकांचा सौर दिव्याच्या प्रकाशात रात्र काढण्याचा दररोजचा प्रसंग आता कालबाह्य होणार आहे.
तुंगी हे दुर्गम भागात वसलेले गाव वीज, रस्ता या पायाभूत सुविधांपासून कोसो दूर आहे. खांडस ग्रामपंचायतीमधील तुंगी गावाच्या पायथ्याशी पूर्वेकडे असलेल्या खांडस गावात पाझर तलाव आणि तर पाठीमागे असलेल्या डोंगरपाडा गावात देखील पाझरतलाव आजही काठोकाठ भरलेला आहे. असे असतानाही टेकडीवर असलेल्या तुंगीमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष असते. ८० घरांची वस्ती असलेल्या या गावात जाण्यासाठी रस्ता वन विभाग आपल्या जमिनीतून करू देत नाही, त्यामुळे विजेचे खांब देखील टाकता येत नाहीत.त्यामुळे या तुंगी गावात वर्षानुवर्षे अंधाराचे साम्राज कायम असते. त्यावर काही प्रमाणात मात करण्याचा प्रयत्न तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या अनसूया पादिर यांनी प्रथम तुंगी गावासाठी आपल्या निधीतून सौर दिवे दिले. त्यावेळी गावाच्या वेशी उजळण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने करून बघितला होता. त्यानंतर आदिवासी प्रकल्प विभागाने त्या गावातील घरात दिव्यांचा प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला. गावातील ८० घरातील प्रत्येक घरी एक असे ८० सौर दिवे दिले. २००५ मध्ये या गावाची दैना पावसाळ्यात दरडी कोसळून आणि आजूबाजूला असलेल्या डोंगरात भूस्खनन होऊन झाली. गाव विस्थापित करण्याची वेळ आहे. शेतजमीन त्या भागात असल्याने स्थानिकांनी त्याच भागात विस्थापन करण्याची मागणी केली होती. मात्र रखडलेले काम आजही त्याच स्थितीत असून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे यांनी समाज कल्याण विभागातून प्रत्येकी १५ हजार खर्च असलेले ४० सौर दिवे असलेले किट मंजूर करून घेतले. या सौर दिव्यांच्या किट आज तुंगीमधील प्रत्येक घरावर दिसून येतात. त्यामुळे सौर दिव्याच्या प्रकाशात आयुष्य काढावे लागेल अशी परिस्थिती असताना या भागाचे खासदार श्रीरंग बारणे कर्जत दौऱ्यावर आले असता त्यांनी खांडस भागात तुंगी ग्रामस्थांची भेट घेतली. वन विभागाकडे आपण पाठपुरावा करून रस्ता आणि विजेचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. पुढे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत खासदार बारणे, आमदार लाड,जिल्हा परिषद सदस्य पेमारे यांनी तुंगी गावाचा प्रश्न सतत लावून धरला होता.
सततच्या पाठपुराव्याला यश आले असून महावितरण कंपनीने तुंगी गावातील विजेच्या प्रस्ताव वन विभागाकडे जमीन मिळण्यासाठी केला. वन विभागाने आपल्या जमिनीतून डोंगरपाडा ते तुंगी अशा मार्गात विजेचे खांब बसविण्यास मंजुरी दिल्यानंतर दीनदयाळ उपाध्याय जीवन ज्योती योजनेमधून वीज पुरवठा करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.