रायगड किल्ल्यावरील हत्ती तलाव पडला कोरडा ठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 12:03 AM2020-11-23T00:03:48+5:302020-11-23T00:04:08+5:30
शिवप्रेमी दाद मागणार; दुरुस्ती करुन ही गळती थांबली नाही
गिरीश गोरेगावकर
माणगाव : किल्ले रायगडावरील हत्ती तलावामध्ये पाण्याचा साठा व्हावा, यासाठी काेट्यवधी रुपये खर्च करण्यात आले हाेते. हत्ती तलावाची गळती काही थांबली नाही. मात्र दुरुस्तीसाठी केलेला काेट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेला आहे. जनसेवा संघटना माणगावचे अध्यक्ष ॲड. अनिकेत ठाकूर यांच्यासह अन्य शिवप्रेमींनी हत्ती तलावाच्या झालेल्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
रायगड किल्ला हा शिवप्रेमींच्या नव्हे तर उभ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. रायगडचे सुशाेभीकरण व्हावे, त्याचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ साली रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली हाेती. राज्य सरकारने तब्बल ६०० काेटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात ६० काेटी आणि दुसऱ्या टप्प्यात २० काेटी रुपये आले आहेत. ६०० काेटी रुपयांमध्ये पाचाड ते महाड या चार पदरी रस्त्यासाठी २५० काेटी खर्च करण्यात येणार आहेत. तर उर्वरित निधीमध्ये रायगड किल्ल्याची डागडुजी, गडाच्या पायथ्याला शिवसृष्टी उभारणे आणि जिजामाता समाधी स्थळाचा विकास करणे या कामांचा समावेश आहे. हत्ती तलावामध्ये वर्षभर पाणी साठून राहावे यासाठी त्याची दुरुस्ती करण्यात आली हाेती. त्यातील काही प्रमाणात काम बाकी हाेते. काम पूर्ण हाेण्याआधीच हत्ती तलावातील पाण्याला गळती लागून तलाव काेरडा पडला आहे. काेट्यवधी रुपये खर्च करूनही काम व्यवस्थित झाले नसल्याबाबत शिवप्रेमींमध्ये नाराजी आहे.
छत्रपती शिवरायांनी रायगडाची प्राकृतिक रचना व पाण्याचे महत्त्व ओळखून राजधानीसाठी निवड केली. या रायगडावर ८४ पाणीसाठे आहेत. दरवर्षी रायगडावर येणाऱ्या पर्यटकांची गर्दी पाहता गडावर पाण्याचा साठा राहावा याकरिता हत्ती तलावातील गाळ काढून त्याची गळती दुरुस्ती करावी याकरिता रायगड विकास प्राधिकरणाने या हत्ती तलावाची गळती सुधारण्यासाठी असलेल्या शोध मोहिमेसाठी व्हिडीओग्राफी, फोटोग्राफी व रेखाटने करून अभ्यास केला.
तलावाच्या भिंतीला पडल्या होत्या चिरा
nहा तलाव काहीसा उतरता असल्याने पाण्याचा दाब भिंतीला सहन होत नाही. त्याचबरोबर एवढ्या वर्षांनंतर तलावाच्या भिंतीला चिरा पडल्या होत्या. त्यातूनही पाणीगळती होत होती. वेगवेगळ्या टप्प्यांत घेतलेल्या निरीक्षणांमुळे गळतीची तीव्रता व ठिकाण समजण्यास मदत झाली. ही गळती थांबविण्यासाठी खास यंत्र बनवून घेण्यात आले. तलावातील संपूर्ण गाळ काढला.
nतलावाच्या आतील भागातील घळीतून उच्च दाबाने पाणी सोडून स्वच्छ करून पोकळीत सात दिवस भिजवलेला चुना, चांगल्या भाजलेल्या विटांची भुकटी आणि बेलफळाचं पाणी असे मिश्रण आठ ते नऊ फूट आतील पोकळीत सोडले आणि तलावाची गळती थांबवली. हे काम लॉकडाऊनच्या अलीकडे संपले हाेते. त्यानंतर १० जुलैला हत्ती तलाव तुडुंब भरल्याचे विकास प्राधिकरणाच्या ठेकेदारांनी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, वास्तू संवर्धक वरुण भामरे यांनी स्पष्ट केले हाेते.
nऑक्टोबर महिन्यात भरपूर पाऊस होऊनही तलाव कोरडा ठाक पडला आहे. त्यामुळे विकास प्राधिकरणाच्या या हत्ती तलाव दुरुस्तीच्या कामात शिवप्रेमींकडून संशय व्यक्त केला जात आहे. या खराब कामाची केंद्रीय पुरातत्त्व खाते आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने चौकशी करावी, अशी मागणी जनसेवा संघटनेचे अध्यक्ष ॲड. अनिकेत ठाकूर आणि शिवप्रेमींनी केली आहे.