उरण : एलिफंटा बेटावर निसर्गाच्या सानिध्यात, नृत्याचा सुखद आनंद व शिल्प, दिव्यांग, अनाथ मुलांसाठी घडविण्यात आलेली लेण्यांची सफर, पर्यटकांसाठी हेरिटेज वॉक आणि चित्रकलेच्या आविष्कारात शनिवारपासून रंगलेल्या एलिफंटा महोत्सवाची गायक राहुल देशपांडे, स्वप्निल बांदोडकर, प्रियांका बर्वे यांच्या गीतांच्या कार्यक्रमाने सांगता झाली. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शास्त्रीय संगीत, नृत्य गायनात रंगलेल्या महोत्सवाचा आनंद हजारो पर्यटकांनी लुटला.
मागील ३५ वर्षांपासून एलिफंटा बेटावर महोत्सवाचे आयोजन केले जाते. कधी आयोजकाअभावी, तर कधी काही तांत्रिक अडचणींंमुळे तर कधी बेटावर कायमस्वरूपी विजेच्या समस्येमुळे, तर कधी सुरक्षितेच्या कारणास्तव काही दोन ते पाच वर्षांचा अपवाद वगळता बेटावरच दरवर्षी फेब्रुवारीत एलिफंटा महोत्सवाचे आयोजन केले जात होते. मात्र, मागील चार-पाच वर्षांपासून काही समस्या आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव एलिफंटा महोत्सव एलिफंटा बेटाऐवजी गेटवे आॅफ इंडिया (मुंबई) येथे साजरा केला जात होता. एलिफंटा महोत्सव बेटावरच साजरा करण्यात यावा, अशी मागणी घारापुरी सरपंच बळीराम ठाकूर आणि ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती. एलिफंटा बेटावर मागील वर्षी कायमस्वरूपी वीजपुरवठा योजना भाजप-सेना आघाडी सरकारने कार्यान्वित केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात साजरा होणारा महोत्सव उशिराने का होईना पुन्हा एकदा एलिफंटा बेटावर साजरा करण्याच्या निर्णयामुळे देशी-विदेशी रसिक पर्यटकांसह स्थानिकांमध्येही प्रचंड उत्साहाचे वातावरण पसरले होते.
यावर्षी एलिफंटा महोत्सव स्वरंग ही या सोहळ्याची संकल्पना होती. दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात गीत, संगीत, गायन, पर्यटन, चित्रकला आदीची रेलचेल होती. रविवारी संध्याकाळी प्रख्यात गायक राहुल देशपांडे, स्वप्निल बांदोडकर, प्रियांका बर्वे यांच्या गीतांचा कार्यक्रम पार पडला. सलग दोन दिवस रंगलेल्या एलिफंटा महोत्सवाची सांगता शास्त्रीय संगीत, गीतांच्या सदाबहार कार्यक्रमाने झाली. घारापुरी बेटावर गीत, संगीत चित्रकला अशा विविध कलागुणांचा अनोखा मिलाफ पाहायला मिळाला. या आयोजित महोत्सवाची उत्सुकता देशी-विदेशी हजारो पर्यटकांना होती.