पनवेल : ‘नैना’ प्रकल्पबाधित उत्कर्ष समितीने ‘नैना’ विरोधात उपोषणाचा एल्गार पुकारण्याचे ठरवले आहे. पनवेल येथील प्रांत कार्यालयासमोर लवकरच उपोषण करणार असल्याचे विहिघर येथील सभेत एकमताने जाहीर केले आहे. तालुक्यात येऊ घातलेला ‘नैना’ प्रकल्प, वसई विरार, अलिबाग कॉरिडोर या रस्त्याच्या विरोधात ‘नैना’ प्रकल्पबाधित उत्कर्ष समितीने विहिघर येथे सभा आयोजित केली होती. या वेळी अध्यक्ष नामदेव फडके, वामन शेळके, एकनाथ भोपी, विलास फडके, एम. पाटील, नारायण पाटील, राजेश केणी, बाळाराम फडके, डिके भोपी, विजय गुप्ता आदीसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
गेल्या कित्येक वर्षांपासून परिसरात आलेल्या सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता केलेली नाही. ज्यांना प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे, त्यांना नागरिकांची कामे करण्यासाठी निवडून दिलेले आहे. मात्र, तसे होत नसल्याचा आरोप खंडू फडके यांनी केला. या वेळी पनवेल प्रांत कार्यालयावर ५०० हून अधिक शेतकरी उपोषणाला बसणार असून त्याची तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘नैना’ शेतकऱ्यांना भूलथापा देत असून, २०० मीटरच्या आतील जागा घेणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, या जागेवरदेखील ‘नैना’ अधिकार दाखवत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. ‘नैना’ला कडाडून विरोध करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने, ‘आम्हाला ‘नैना’ नको’ असा ठराव घ्यायला हवा. या वेळी सिडको अध्यक्षांना निवेदन देऊनही काही झाले नाही तर शासनाविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा एकनाथ भोपी यांनी दिला. येथील आमदारांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करावयास हवा होता. मात्र, कोणत्याही आमदाराने अधिवेशनात ‘नैना’ संदर्भात प्रश्न उपस्थित केलेला नाही. लोकप्रतिनिधी केवळ मते मागण्यासाठी येतात. मात्र, ‘नैना’विषयी बोलण्यासाठी कोणीही येत नसल्याचा आरोप अनिल ढवळे यांनी केला.
कुळकायदा संपविण्याच्या मार्गावर सरकार आहे. रायगड अशी भूमी आहे की, येथील नागरिकांनी केलेल्या आंदोलनामुळे शासनाला यापूर्वीदेखील नमते घ्यावे लागले आहे. त्यामुळे आपल्याला आंदोलनाशिवाय गत्यंतर नाही. अद्याप भूमी अधिग्रहण कायदा संमत झालेला नाही, तर हे आपली जमीन कशी घेऊ शकतात, असा सवाल या वेळी घरत यांनी केला. प्रत्येक शेतकºयाने आपल्या शेतीत ‘नैना’ नको, ‘नैना’ हटाव, असा फलक लावण्याचे आवाहन या वेळी शेतकºयांना करण्यात आले. शेतकºयांकडून ‘नैना’ हटावची शपथ घेण्यात आली.