लोकमत न्यूज नेटवर्कश्रीवर्धन : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेत, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची सुरुवात केली आहे. जनतेच्या सहकार्यातून कोरोना विषाणूचा समर्थपणे सामना करत, त्याचे निर्मूलन करण्याचे आपले ध्येय असल्याचे, राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन नगरपरिषदेत शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला, कोरोना निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून पंचायत समिती, नगरपरिषद, आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून विविध गटांची निर्मिती करून सर्वत्र सर्वेक्षण करणार आहोत. घरात आजारी असलेल्या प्रत्येक व्यक्ती, त्याच सोबत त्या व्यक्तीच्या आजाराविषयी योग्य ती माहिती त्याच्याकडून संकलित करून, त्या व्यक्तीस आरोग्यविषयक योग्य मार्गदर्शन करून, त्यास तत्काळ वैद्यकीय सेवा आपण उपलब्ध करून देणार आहोत. कोरोनाचे लक्षण असणारे व्यक्ती, कोरोनाबाधित मात्र लक्षणे नसणारी व्यक्ती या सर्वांना योग्य वेळी वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेस सुरुवात केलीे.
आजाराने बाधित झाल्याने अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला. हा मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सदरची मोहीम अतिशय महत्त्वाचे आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले. प्रशासनाने निर्माण केलेली टीम एका दिवसात किमान ५० व्यक्तींची चाचणी दिवसभरात करणार आहे. त्यानुसार, सर्व नियोजन करण्यात आले आहे. शिक्षक, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, नगरपालिका कर्मचारी या सर्वांची या मोहिमेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. जनतेने या सर्व घटकांना सहकार्य करून मोहीम यशस्वी करावी असे आवाहन तटकरे यांनी केले. दरम्यान, तटकरे यांनी भोस्ते, श्रीवर्धन शहरातील कसबा, मोहल्ला या भागात फिरून गृहभेट देत व्यक्तींचे तापमान मोजणे, त्यांच्या हाताला सॅनिटायझर लावणे, मास्क लावण्याविषयी सूचना केल्या. श्रीवर्धन नगरपरिषदेचे प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, मुख्याधिकारी किरणकुमार मोरे नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, तालुका अध्यक्ष दर्शन विचारे आदी उपस्थित होते. आज श्रीवर्धन शहरातील विविध भागांतील घरांमध्ये जाऊन लोकांना कोरोनाविषयी सजग केले आहे. गृह भेटीदरम्यान संबंधित घरांतील व्यक्तींचे कोरोनाविषयीची लक्षणे, विचार, त्यांची कृतिशीलता या सर्व बाबी जाणून घेतल्या आहेत. माझ्या मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेणे, त्याचे निराकरण करणे हे माझे दायित्व आहे. -आदिती तटकरे, पालकमंत्री रायगड